Home Loan Options: स्वतःचे हक्काचे घर खरेदी करणे हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा आर्थिक टप्पा असतो. सध्या घरांच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे बहुतांश कुटुंबांना गृहकर्जाचा (Home Loan) आधार घ्यावा लागतो. मात्र, अनेकदा ग्राहक केवळ बँकांचे व्याजदर आणि महिन्याचा ईएमआय (EMI) किती येईल, एवढाच विचार करतात. गृहकर्जाची रचना (Loan Structure) कशी आहे, याकडे दुर्लक्ष केल्यामुळे नंतर पश्चात्ताप करण्याची वेळ येते. कर्ज निवडताना घेतलेला एक चुकीचा निर्णय पुढील कित्येक वर्षे तुम्हाला आर्थिक विवंचनेत टाकू शकतो. म्हणूनच, बँकेची पायरी चढण्यापूर्वी बाजारात उपलब्ध असलेल्या प्रमुख पर्यायांची सखोल माहिती असणे आवश्यक आहे.
कमी व्याजदराच्या मोहापेक्षा दीर्घकालीन गणिताला द्या प्राधान्य
गृहकर्ज ही साधारणपणे 15 ते 30 वर्षांची एक मोठी आर्थिक जबाबदारी असते. त्यामुळे केवळ 'कमी व्याजदर' ही एकच गोष्ट पाहून डोळे झाकून सही करणे अंगलट येऊ शकते. आजकाल बँका आणि गृहनिर्माण वित्त कंपन्या (HFCs) ग्राहकांच्या सोयीसाठी विविध प्रकारच्या कर्ज योजना आणतात. यामध्ये 'मोरेटोरियम लोन' (Moratorium Loan), 'नो-ईएमआय-टिल-पझेशन' (No-EMI-till-possession) आणि 'बलून पेमेंट लोन' (Balloon Payment Loan) या तीन पर्यायांचा प्रामुख्याने समावेश होतो. या प्रत्येक योजनेचे जितके फायदे आहेत, तितकेच काही छुपे धोकेही आहेत.
1. मोरेटोरियम लोन: तात्पुरती नड भागवणारा, पण पुढे खर्च वाढवणारा पर्याय
ज्या नोकरदारांना किंवा व्यावसायिकांना सध्या तात्पुरत्या आर्थिक अडचणी आहेत, त्यांच्यासाठी मोरेटोरियम गृहकर्ज फायदेशीर ठरते. या सुविधेत ग्राहकाला कर्जाच्या सुरुवातीच्या काही ठराविक महिन्यांसाठी किंवा वर्षांसाठी नियमित मासिक हप्ता (EMI) भरण्यापासून सूट मिळते. जे लोक नवीन नोकरी शोधत आहेत किंवा ज्यांचे उत्पन्न भविष्यात वाढणार आहे, त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय आहे. परंतु, इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, या सवलतीच्या काळात बँकेचे व्याज आकारणे बंद होत नाही. ते व्याज तुमच्या मुद्दल रकमेत जोडले जाते, ज्यामुळे नंतरच्या काळात तुमचा मासिक हप्ता किंवा कर्जाचा एकूण कालावधी वाढतो.
2. 'नो-ईएमआय-टिल-पझेशन': भाडे आणि हप्त्यांच्या दुहेरी कत्रीतून सुटका
बांधकाम सुरू असलेल्या (Under-construction) इमारतींमध्ये फ्लॅट बुक करणाऱ्या ग्राहकांमध्ये ही योजना विशेष लोकप्रिय आहे. या योजनेअंतर्गत, घराचा प्रत्यक्ष ताबा मिळेपर्यंत खरेदीदाराला बँकेचा नियमित ईएमआय भरावा लागत नाही. सध्या भाड्याच्या घरात राहणाऱ्या आणि नवीन घराचे हप्ते फेडणाऱ्या मध्यमवर्गीयांना यामुळे मोठा दिलासा मिळतो, कारण त्यांना एकाच वेळी भाडे आणि ईएमआयचा दुहेरी भार सोसावा लागत नाही. मात्र, तज्ज्ञांच्या मते, या 'ईएमआय हॉलिडे'च्या नावाखाली अनेकदा बांधकाम व्यावसायिक घराच्या मूळ किमतीतच हा छुपा खर्च आधीच जोडून ठेवतात, ज्याची पडताळणी करणे गरजेचे आहे.
3. 'बलून पेमेंट' लोन: सुरुवातीला सुखाचा प्रवास, शेवटी मोठा आर्थिक दणका!
या कर्जाची रचना अत्यंत वेगळी आणि रंजक असते. यात कर्जाच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये तुमचे मासिक हप्ते (EMI) खूप कमी ठेवले जातात, जेणेकरून खिशावर ताण पडणार नाही. परंतु, कर्जाची मुदत संपताना किंवा शेवटच्या टप्प्यात ग्राहकाला एक मोठी एकरकमी रक्कम (Lump-sum Amount) बँकेला मोजावी लागते. कॉर्पोरेट क्षेत्रातील मोठे बोनस मिळणारे कर्मचारी, स्टार्टअप उद्योजक किंवा ज्यांना भविष्यात मोठ्या नफ्याची खात्री आहे, त्यांच्यासाठी हा पर्याय योग्य ठरतो. मात्र, जर भविष्यात अपेक्षेप्रमाणे उत्पन्न मिळाले नाही, तर शेवटची मोठी रक्कम भरताना दिवाळे निघू शकते; म्हणूनच यासाठी तगडे आर्थिक नियोजन आवश्यक आहे.
तुमच्या खिशाला काय परवडणार?
कोणती कर्ज योजना सर्वोत्तम आहे, हे पूर्णपणे तुमच्या सध्याच्या उत्पन्नावर आणि भविष्यातील नियोजनावर अवलंबून असते. जर तुम्हाला सुरुवातीला काही काळ हप्त्यांपासून आराम हवा असेल तर 'मोरेटोरियम' निवडा. जर बांधकाम सुरू असलेले घर घेत असाल आणि एकाच वेळी भाडे भरणे अशक्य असेल, तर 'ताबा मिळेपर्यंत हप्ता नाही' हा पर्याय निवडा. तर भविष्यात मोठी रक्कम हाती येणार असेल तरच 'बलून पेमेंट'चा विचार करा. तज्ज्ञांच्या मते, कोणत्याही गृहकर्जाच्या करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी बँकेच्या सर्व अटी, शर्ती आणि छुपा खर्च डोळ्यांखाली घालूनच अंतिम निर्णय घ्यावा.