Ajit Pawar Plane Crash: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूच्या प्रकरणाला आता एका थरारपटासारखं वळण मिळालं आहे. आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी चक्क खासगी गुप्तहेर संस्थांची (Private Detectives) मदत घेण्याचा निर्णय घेतला असून, येत्या बुधवारी (18 फेब्रुवारी) ते मुंबईत एक अत्यंत महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहेत. या परिषदेत ते नेमके कोणते 'बॉम्ब' फोडणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
तपासासाठी दिल्लीच्या एजन्सीशी हातमिळवणी?
सरकारी तपास यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर रोहित पवार आता स्वतःच्या स्तरावर समांतर तपास करत असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात रोहित पवार यांनी दिल्लीत दोन मोठ्या खासगी गुप्तहेर संस्थांच्या प्रतिनिधींची भेट घेतली. विमान कोसळण्यापूर्वीच्या हालचाली आणि सुरक्षेतील संभाव्य त्रुटींचा शोध घेण्याची जबाबदारी त्यांनी एका स्वतंत्र यंत्रणेवर सोपवली असल्याचे बोलले जात आहे.
बुधवारी वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये काय घडणार?
पहिल्या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी अपघाताच्या वेळेबाबत आणि घटनाक्रमाबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. आता दुसऱ्या फेरीत ते अधिक ठोस पुरावे सादर करण्याची शक्यता आहे. अपघातानंतर काही तासांत जे निर्णय घेण्यात आले त्यामागील कागदपत्रे आणि पुरावे ते समोर आणू शकतात. तथापी, सरकारी यंत्रणांनी दुर्लक्षित केलेले तांत्रिक मुद्दे देखील रोहित पवार लोकांसमोर मांडण्याची शक्यता आहे.
राजकीय भूकंपाचे काऊंटडाऊन
दरम्यान, 18 फेब्रुवारीची सकाळ राज्याच्या राजकारणासाठी 'निर्णायक' ठरू शकते. रोहित पवारांनी यापूर्वीच अपघाताच्या सत्यतेवर संशय व्यक्त करून सत्ताधाऱ्यांना बॅकफूटवर नेले आहे. आता खासगी तपासातून मिळालेली माहिती जर त्यांनी सार्वजनिक केली, तर राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही.