Bihar Election Result 2025: बिहार विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीने चित्र स्पष्ट झाले आहे. भाजप–जदयूच्या एनडीए आघाडीने दणदणीत आघाडी घेतली असून 243 पैकी 200 हून अधिक जागांवर विजयाचे संकेत मिळत आहेत. दुसरीकडे काँग्रेस–आरजेडी महागठबंधन केवळ सुमारे 35 जागांवर मर्यादित दिसत आहे. या घडामोडींनी अनेकांना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या निकालाची आठवण करून दिली आहे, कारण बिहारमध्येही महायुतीसारखेच एकतर्फी चित्र दिसत आहे.
निकालांचे कल स्पष्ट होत असतानाच राज्यातील नेतेमंडळीदेखील प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. एनडीएमध्ये उत्साहाचा माहोल असून शिवसेना व काँग्रेसकडून तीक्ष्ण विश्लेषण सुरू आहे. दरम्यान, बिहारमधील विजय हा फक्त “ट्रेलर” असून खरी लढत मुंबई महापालिकेत होणार असल्याचा दावा भाजप नेते अमित साटम यांनी केला आहे. भाजप मुंबईचे अध्यक्ष अमित साटम म्हणाले, “वोट चोरीचा खोटा प्रचार बिहारच्या मतदारांनी धुळीस मिळवला. बिहार निवडणूक फक्त ट्रेलर आहे. खरी लढाई मुंबई महापालिकेत रंगणार आहे.”
त्यांनी पुढे दावा केला की, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांतही एनडीएला प्रचंड समर्थन मिळेल. राहुल गांधी, तेजस्वी यादव व उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी म्हटले, “राजकारणातील खरे पप्पू कोण आहेत, हे देशाला आता समजले आहे. राहुल गांधींच्या मागे उभे राहणारे एकामागून एक पराभूत होत आहेत.” दरम्यान, साटम यांनी पुढे दावा केला की, मुंबईकर विरोधकांना जोरदार उत्तर देतील. मुंबईत भगवा फडकवल्याशिवाय ते शांत बसणार नाहीत.
हेही वाचा – Nitish Kumar Bihar Election : बिहार निवडणुकीत नितीश कुमार यांच्या महाविजयाची 5 कारणे कोणती?
ही लोकशाहीची पराभवकथा; शिवसेनेची टीका
शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी निवडणूक निकालावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांच्या मते, “हा पराभव काँग्रेस किंवा महाविकास आघाडीचाच नाही. तर देशातील संसदीय लोकशाहीचा पराभव आहे. स्वायत्त संस्था जर सत्ताधाऱ्यांच्या पायगड्यात असतील तर भिन्न निकालाची अपेक्षा व्यर्थ आहे.”
महाराष्ट्र पॅटर्न पुन्हा रिपीट
तथापी, खासदार संजय राऊत यांनीही बिहार निकालाचा संदर्भ महाराष्ट्राशी जोडला. त्यांनी ट्विट करत म्हटले की, 'बिहारमध्येही महाराष्ट्रसारखाच पॅटर्न लागू करण्यात आला. ज्यांना सत्ता मिळणार हे आधीच ठरलेले होते, त्यांनाच 50 च्या खाली रोखले. निवडणूक आयोग आणि भाजप एकत्र असताना वेगळा निकाल येणे शक्यच नव्हते.'