Ashok Kharat Case : नाशिकमध्ये सध्या ‘भोंदू’ अशोक खरात प्रकरण चांगलेच गाजत असून, या प्रकरणातील राजकीय धागेदोरे आता अधिक गडद होऊ लागले आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी शुक्रवारी नाशिक पोलीस आयुक्तांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी खरात प्रकरणावर सविस्तर चर्चा केली आणि प्रकरणातील गंभीर बाबींकडे लक्ष वेधले.
राज्य महिला आयोगावर गंभीर आरोप
या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना नेत्यांनी राज्य महिला आयोगाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “खरातचे रॅकेट रूपाली चाकणकर चालवत होत्या,” असा थेट आरोप रूपाली ठोंबरे पाटील यांनी केला आहे. पीडित महिला जेव्हा समस्या घेऊन महिला आयोगाकडे जात होत्या, तेव्हा त्यांचे समुपदेशन करण्याऐवजी “तुमच्या पत्रिकेतील ग्रह तपासा, एक बाबा आहेत त्यांना भेटा,” असे सांगून त्यांना जाणीवपूर्वक अशोक खरातकडे पाठवले जात होते, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे. ही बाब इतकी गंभीर असताना रुपाली चाकणकरांची चौकशी अजून का नाही, असाही प्रश्न उपस्थित केला.
एसआयटी चौकशी आणि कायदेशीर मागणी
नाशिक पोलिसांनी या प्रकरणाचा तपास आता विशेष तपास पथकाकडे (SIT) वर्ग केला आहे. सुषमा अंधारे यांनी सांगितले की, पहिल्या एफआयआर (FIR) नंतर 3 दिवसांतच SIT ची स्थापना करण्यात आली होती. सध्या सर्व कागदपत्रे आणि तपास अधिकारी (IO) सूर्यवंशी SIT कडे वर्ग करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासाची पुढील गती आता SIT शी चर्चा केल्यानंतर स्पष्ट होईल. मात्र, अंधारे आणि ठोंबरे पाटील यांनी रूपाली चाकणकर यांना या प्रकरणात तातडीने अटक करण्याची मागणी करत नाशिक पोलीस आयुक्तांना कायदेशीर निवेदन दिले आहे.
राजकीय संघर्षाला नवे वळण
अशोक खरात प्रकरणाने आता महिला सुरक्षेसोबतच राजकीय संघर्षाचे रूप धारण केले आहे. सुषमा अंधारे, रूपाली ठोंबरे पाटील आणि संगीता तिवारी यांनी एकत्र येत सरकारवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. भोंदूगिरीच्या नावाखाली महिलांचे शोषण करणाऱ्या खरातला राजकीय संरक्षण कोणाचे होते, हा मुख्य प्रश्न या भेटीदरम्यान उपस्थित करण्यात आला. नाशिक पोलीस आयुक्तालयातील या भेटीमुळे आता SIT चा तपास अधिक वेगाने होण्याची शक्यता निर्माण झाली असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र होणार आहेत.