Suresh Dhas : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बीड जिल्ह्यातील आष्टी येथे एका भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला अमृता फडणवीस यांची विशेष उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमादरम्यान आमदार सुरेश धस यांनी अमृता फडणवीस यांच्या सामाजिक तसेच राजकीय भूमिकांचे तोंडभरून कौतुक केले. 2019 च्या राजकीय घडामोडींनंतर जेव्हा सत्तेच्या विरोधात बोलायला लोक कचरत होते, तेव्हा अमृताताईंनी अत्यंत धैर्याने आपली मते मांडल्याचे सांगत धस यांनी त्यांच्या जुन्या विधानांची आठवण ताजी केली. याच मंचावरून धस यांनी अमृताताईंकडे हात जोडून एक महत्त्वपूर्ण मागणी केली. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर बीड जिल्ह्याला 966 कोटी रुपयांचा निधी देवेंद्र फडणवीस यांनीच मिळवून दिला, असे सांगत बीडमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल कॉलेज) मंजूर करण्यासाठी देवेंद्रजींकडे शब्द टाकावा, अशी आग्रही विनंती त्यांनी केली.
'सुरेश धसांच्या आपुलकीमुळेच बीडमध्ये येण्याचा योग' – अमृता फडणवीस
आमदार सुरेश धस यांच्या आग्रहास्तव मी आयुष्यात पहिल्यांदाच बीड जिल्ह्यात येऊ शकले, असं वक्तव्य यावेळी अमृता फडणवीस यांनी केलं. देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस सलग 10 दिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा केल्याबद्दल त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांचे आभार मानले. बीडच्या बळीराजाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, शेतकरी बांधवांमुळेच देश समृद्ध आणि सुदृढ राहतो, त्यामुळे प्रत्येकाचे आरोग्य निरोगी राहणे आवश्यक आहे. या आरोग्य शिबिराचा सर्वसामान्य जनतेने जास्तीत जास्त फायदा घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
'अन्यायाविरुद्ध बोलल्याशिवाय राहत नाही'; अमृता फडणवीस
आपल्या सडेतोड आणि मनमोकळ्या संवादासाठी ओळखल्या जाणाऱ्या अमृता फडणवीस यांनी व्यासपीठावरून उपस्थित जनसमुदायाशी संवाद साधला. "जेव्हा समाजात किंवा राजकारणात प्रमाणाबाहेर अन्याय होतो, तेव्हाच मी बोलते," असे त्या म्हणाल्या. सत्तेत असणाऱ्या व्यक्तीने आपल्या पदाचा वापर लोकांची सेवा करण्यासाठी आणि सत्ता अधिक सक्षम करण्यासाठी केला पाहिजे, तरच तो माणूस मोठा होतो, असा सल्लाही त्यांनी दिला. आमदार सुरेश धस हे जनतेच्या सेवेसाठी कायम तत्पर असतातच, पण बीडच्या नागरिकांना कधीही कोणतीही मदत लागल्यास मी स्वतः मदतीसाठी धावून येईन, असे आश्वासन देत धस यांनी मला अशा कार्यक्रमांसाठी वारंवार बोलवत राहावे, अशी इच्छा व्यक्त केली.