Rupali Patil Thombare: अजितदादांच्या आकस्मिक निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी एक खळबळजनक विधान केले आहे. “सुनेत्रा वहिनींची उपमुख्यमंत्री बनण्याची वैयक्तिक इच्छा नव्हती, परंतु अनाथ झालेल्या राष्ट्रवादी परिवाराला सावरण्यासाठी आम्ही कार्यकर्त्यांनीच त्यांना हा निर्णय घ्यायला भाग पाडले,” असे रुपाली ठोंबरे यांनी म्हटलं आहे.
स्वतःच्या दुःखावर दगड ठेवून घेतला निर्णय
अजितदादांच्या निधनानंतरचा हा काळ पवार कुटुंबासाठी अत्यंत कठीण आहे. यावर बोलताना रुपाली ठोंबरे भावूक झाल्या. त्या म्हणाल्या, “नियतीने महाराष्ट्रावर आणि पवार कुटुंबावर मोठे संकट आणले आहे. सुनेत्रा वहिनींचे कुंकू गेले आहे, हे दुःख पचवणे सोपे नाही. अस्थिविसर्जन आणि सावडण्याचा कार्यक्रम सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग आला होता. अशा स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना आधार देण्यासाठी वहिनींनी स्वतःच्या दुःखावर दगड ठेवून ही शपथ घेतली आहे.”
टीका करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर
शपथेच्या वेळेवरून होत असलेल्या टीकेला ठोंबरे यांनी जोरदार उत्तर दिले. “टीका करणारे राजकीय स्वार्थ पाहत आहेत. दादा गेल्यानंतर अवघे 4 दिवस झाले आहेत, पण विरोधकांनी या माऊलीला तिच्या दुःखावर फुंकर घालायलाही वेळ दिला नाही. जर वहिनींनी हा निर्णय घेतला नसता, तर याच टीका करणाऱ्यांनी आतापर्यंत सर्व काही हिरावून नेले असते. दादांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्यासाठी आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पोरकं न ठेवण्यासाठी घेतलेला हा निर्णय अत्यंत योग्य आहे,” असे त्यांनी नमूद केले.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार?
अजितदादांची दोन्ही पक्ष एकत्र आणण्याची मनापासून इच्छा होती आणि ही बाब सुनेत्रा वहिनींना पूर्णपणे माहिती होती, असेही ठोंबरे यांनी सांगितले. “दोन्ही पक्ष एकत्र येण्याची वेळ दादांनीच ठरवली होती. आता दादांच्या पश्चात वहिनींकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि आमदारांनी अधिकार दिले आहेत. आगामी काळात पवार कुटुंब एकत्र बसून जो काही निर्णय घेईल आणि वहिनी आम्हाला जो आदेश देतील, तो आम्हाला दादांच्या आदेशाप्रमाणेच मान्य असेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.