Sumit Antil: सुमित अंतिलने पुन्हा रचला इतिहास; 74.82 मीटर भाला फेकत 7 व्यांदा मोडला स्वतःचाच वर्ल्ड रेकॉर्ड

बंगळुरू येथील श्री कांतीरवा आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आयोजित 8 व्या 'इंडियन ओपन पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप'मध्ये सुमितने अद्भूत कामगिरी केली.

Sumit Antil: सुमित अंतिलने पुन्हा रचला इतिहास; 74.82 मीटर भाला फेकत 7 व्यांदा मोडला स्वतःचाच वर्ल्ड रेकॉर्ड

Sumit Antil: भारताचा दिग्गज पॅरा-ॲथलीट सुमित अंतिल याने क्रीडा जगतात पुन्हा एकदा आपल्या नावाचा डंका वाजवला आहे. बंगळुरू येथील श्री कांतीरवा आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आयोजित 8 व्या 'इंडियन ओपन पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप'मध्ये सुमितने अद्भूत कामगिरी केली. या स्टार भालाफेकपटूने आपल्या कारकिर्दीत तब्बल 7 व्यांदा जागतिक विक्रम मोडीत काढत क्रीडा विश्वाला थक्क केले आहे. 27 मे रोजी झालेल्या F64 गटातील भालाफेक स्पर्धेत, 27 वर्षीय सुमितने 74.82 मीटर अंतरावर भाला फेकून एक नवा मैलाचा दगड प्रस्थापित केला. यापूर्वी 2023 च्या आशियाई पॅरा गेम्समध्ये त्याने नोंदवलेला 73.29 मीटरचा स्वतःचाच विक्रम आता भूतकाळ बनला आहे.

2019 पासून सुरू असलेला विक्रमी प्रवास
सुमित अंतिलसाठी जागतिक विक्रम रचणे आता एक सवय बनली आहे. 2019 पासून या क्रीडा प्रकारात त्याचे एकछत्री वर्चस्व राहिले आहे. त्याच्या या ऐतिहासिक प्रवासाची सुरुवात 2019 मध्ये इटली येथील 'वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स'मध्ये झाली होती, जिथे त्याने 61.32 मीटर भालाफेक करत पहिला जागतिक विक्रम केला होता. त्यानंतर 2021 च्या ऐतिहासिक टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकताना त्याने एकाच स्पर्धेत अनुक्रमे 66.95 मीटर, 68.08 मीटर आणि 68.55 मीटर अंतर गाठत तीन वेळा विश्वविक्रम मोडीत काढला. त्याच वर्षी 'इंडियन ओपन'मध्ये त्याने 68.62 मीटरची नोंद केली, तर 2023 च्या हांगझोऊ आशियाई खेळात 73.29 मीटरचा टप्पा पार केला. आता बंगळुरूमध्ये 74.82 मीटर अंतर पार करत त्याने स्वतःचेच जुने रेकॉर्ड्स मोडीत काढले आहेत.

हेही वाचा – Rishabh Pant : आयपीएलमध्ये मोठा भूकंप! रिषभ पंतचा LSG च्या कर्णधारपदाचा राजीनामा; हा खेळाडू घेणार जागा?

जागतिक क्रीडा मंचावर सुमितचे सुवर्ण वर्चस्व
सुमित अंतिलने केवळ लांब अंतरावर भालाफेक केली नाही, तर जगातील सर्वोच्च स्पर्धांमध्ये भारताला सुवर्णपदकेही मिळवून दिली आहेत. 2024 च्या पॅरिस पॅरालिम्पिक्समध्ये त्याने 70.59 मीटर भालाफेक करून सलग दुसरे पॅरालिम्पिक सुवर्णपदक आपल्या नावावर केले. याशिवाय, जागतिक अजिंक्यपद स्पर्धांमध्येही त्याचेच नाव आघाडीवर राहिले आहे. 2023 मध्ये पॅरिस, 2024 मध्ये कोबे आणि 2025 मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या लागोपाठ तीन 'वर्ल्ड चॅम्पियनशिप'मध्ये त्याने सुवर्णपदक पटकावून 'विश्वविजेता' बनण्याचा मान मिळवला आहे. दरम्यान, बंगळुरू येथील त्याचा हा ताजा 74.82 मीटरचा पराक्रम 'वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स'च्या अधिकृत मंजुरीनंतर जागतिक पटलावर रीतसर नोंदवला जाईल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number