Aditya Thackeray Bodyguard Death: पुण्यातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले आणि आपल्या शांत स्वभावासाठी ओळखले जाणारे कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी सुशील मोहन भांडे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मूळचे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील भोंगवली गावचे असलेले भांडे सध्या मुंबईतील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात सेवा बजावत होते. अत्यंत उमद्या वयात आणि 'ऑन ड्युटी' असतानाच त्यांचे निधन झाल्याने पोलीस वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे.
आदित्य ठाकरेंसोबत 'सावली'सारखी साथ
सुशील भांडे यांनी आपल्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या होत्या. विशेषतः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांचे अंगरक्षक (बॉडीगार्ड) म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ सेवा दिली होती. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यांदरम्यान सावलीसारखे सोबत राहणारे भांडे यांच्या जाण्याने एका विश्वासू सहकाऱ्याला मुकल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; भोंगवली गाव पोरकं
सुशील भांडे यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी भोर येथील भोंगवली येथे आणण्यात आले, तेव्हा संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती. मुंबई पोलीस आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या तुकडीने त्यांना हवेत गोळ्या झाडून मानवंदना दिली. शासकीय इतमामात आणि साश्रू नयनांनी या सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर, पोलीस अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.