Stray Dog Attack: निष्ठा आणि माणसांशी असलेल्या मैत्रीपूर्ण स्वभावामुळे कुत्र्याला सहसा 'माणसाचा सर्वात चांगला मित्र' मानले जाते. मात्र, मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एका मोकाट कुत्र्याने सध्या प्रचंड दहशत निर्माण केली असून प्रशासनाची डोकेदुखी वाढवली आहे. या हिंस्र झालेल्या कुत्र्याने अवघ्या 10 तासांत तब्बल 42 जणांना चावा घेतला आहे. या हल्ल्यांमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
16 जण रुग्णालयात दाखल; 8किलोमीटर परिसरात दहशत
ज्या 42जणांना कुत्र्याने चावा घेतला, त्यापैकी 16 जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. हा कुत्रा इंदूरमधील सांवर रोड परिसरात वावरत असून, त्याने सुमारे आठ किलोमीटरच्या विस्तीर्ण परिसरात लोकांवर हल्ले सत्र सुरू ठेवले आहे. सोशल मीडियावर या घटनेचे काही धक्कादायक सीसीटीव्ही फुटेजही व्हायरल झाले आहेत. यामध्ये हा कुत्रा निवासी भागात एका व्यक्तीवर चाल करून जाताना, रस्त्यावरून जाणाऱ्या महिलेवर अचानक हल्ला करताना, तसेच एका कार्यालयाबाहेर असणाऱ्या सुरक्षा रक्षकालाही चावा घेताना स्पष्ट दिसत आहे.
स्थानिकांचा कारवाईत विलंब झाल्याचा आरोप
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. वारंवार तक्रारी करूनही स्थानिक प्रशासनाने वेळेत कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप रहिवाशांनी केला आहे. "कुत्र्याने मला चावा घेतला आणि आता मला रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे," असे सांगत एका पीडित महिलेने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर बोट ठेवले. तर पहाटेच्या वेळी एका महिलेला चावा घेतल्यानंतर मी तिथे जात असतानाच दुसऱ्या एका व्यक्तीलाही कुत्र्याने माझ्यासमोर चावले, असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
महापालिकेकडून अखेर कुत्रे पकडण्याची मोहीम सुरू
नागरिकांचा वाढता संताप आणि वाढते हल्ले पाहता आता इंदूर महापालिका प्रशासन आणि आरोग्य विभाग खडबडून जागे झाले आहे. प्रशासनाने सांवर रोड आणि संबंधित परिसरात तात्काळ कुत्रे पकडण्याची विशेष मोहीम सुरू केली आहे. यासोबतच प्रशासनाकडून संपूर्ण परिसरात सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला असून, नागरिकांना घरातून बाहेर पडताना विशेष सावधगिरी बाळगण्याचा आणि सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.