Local Body Elections: नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांना मोठा दिलासा दिला आहे. आगामी 2 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या मतदानापूर्वीचा प्रचार कालावधी पूर्वीपेक्षा एक दिवस वाढवण्यात आला आहे. आधी प्रचार करण्याची मर्यादा 30 नोव्हेंबर होती, मात्र आता उमेदवारांना 1 डिसेंबर रात्री 10 वाजेपर्यंत प्रचाराची मुभा मिळणार आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे विशेषत: अपक्ष उमेदवारांना सुटकेचा श्वास मिळाला आहे.
मतदान आणि मतमोजणीचा कार्यक्रम कायम
निवडणूक आयोगाच्या नव्या अधिसूचनेनुसार, 246 नगरपरिषद आणि 42 नगरपंचायतींमध्ये एकूण 6,859 नगरसेवक पदांसाठी आणि 288 प्रमुख पदांसाठी 2 डिसेंबरला मतदान होईल. त्यानंतर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे. प्रचारबंदीची वेळ वाढवली असली तरी 1 डिसेंबर रात्री 10 नंतर कोणतीही सभा, रॅली, मोर्चा, ध्वनिक्षेपकांचा वापर, प्रचार जाहिराती किंवा प्रसारण करण्यावर पूर्ण बंदी असेल. आचारसंहिता काटेकोरपणे पाळावी, असा स्पष्ट आदेश आयोगाने सर्व राजकीय पक्षांना आणि उमेदवारांना दिला आहे.
हेही वाचा – Baramati Election: बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीत मोठी घडामोड! दोन प्रभागांमध्ये मतदान पुढे ढकलले
या निर्णयामागील प्रमुख कारण म्हणजे अपक्ष उमेदवारांकडून झालेल्या तक्रारी. चिन्हांचे वाटप उशिरा झाल्यामुळे त्यांना प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळत नव्हता. आता वाढीव कालावधीमुळे त्यांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळणार आहे, ज्यामुळे त्यांच्या प्रचाराला अधिक गती मिळेल.
राज्यात उत्साहाची लाट
निवडणूक सरशीसाठी 107 लाखांहून अधिक मतदार सज्ज होत आहेत. पुणे, नाशिक, कोकण आणि इतर जिल्ह्यांमध्ये प्रचाराचा जोर वाढला आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनीही उमेदवारांना निवडणूक आयोगाच्या नियमपालनाबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले की प्रचाराची मुदत वाढवल्यामुळे निवडणूक प्रक्रिया अधिक न्याय्य, संतुलित आणि मतदारकेंद्रित होणार आहे.