Municipal Elections Postponed: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक मोहिमा आता निर्णायक टप्प्यात प्रवेश करत असतानाच, मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकींपूर्वी 24 नगरपालिका आणि सुमारे 150 सदस्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या अनपेक्षित बदलामुळे उमेदवार आणि राजकीय पक्षांमध्ये नाराजी वाढली असून, अनेकांना पुन्हा प्रचाराची तयारी करावी लागणार आहे.
निवडणूक आयोगाची भूमिका स्पष्ट
निवडणुका पुढे ढकलण्यामागील कारण स्पष्ट करताना राज्य निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितले की, “कायद्याचा सखोल अभ्यास, मिळालेला कायदेशीर सल्ला आणि सर्व बाजूंचा विचार केल्यावरच हा निर्णय घेण्यात आला आहे.” कलम 17(1)(ब) नुसार कोणत्याही उमेदवाराने न्यायालयात अपील केल्यास, त्याला अर्ज मागे घेण्यासाठी निश्चित वेळ देणे बंधनकारक ठरते. जर हे टाळले तर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेलाच धक्का बसू शकतो आणि निवडणूक रद्द करण्याची वेळ येऊ शकते. हा धोका टाळण्यासाठी काही निवडणुकांचा कार्यक्रम पुढे ढकलावा लागला असल्याचे आयोगाने स्पष्ट केले.
हेही वाचा – Elections 2025 : मुंबईत मतदार यादीत मोठा घोळ! तब्बल 7 हजार मतदारांचे वॉर्ड बदलले
स्थानिक पातळीवर तातडीने अहवाल मागवला
ज्या नगरपालिका आणि प्रभागांची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे, त्या ठिकाणच्या 24 निवडणूक अधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष अहवाल मागवला आहे. नवीन कार्यक्रमानुसार, अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर असणार आहे. तसेच त्या दिवशीच निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार असून 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तथापी, यासाठी 21 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या स्थगित निवडणुकांसाठी आता उमेदवारांना नव्याने रणनीती आखावी लागणार आहे.
हेही वाचा – Sanjay Raut: “मतदारांना पैसेवाटप करून महाराष्ट्राची निवडणुक संस्कृती बिघडली”; राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
हर्षवर्धन सपकाळांचा निवडणूक आयोगावर निशाणा
या निर्णयावर कडक प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आयोगावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, दहा वर्षांनंतर होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे कार्यकर्त्यांसाठी मोठा उत्सव असतो, पण आयोगानेच गोंधळ माजवला आहे. अर्ज भरण्यापासून मतदार याद्यांपर्यंत सर्वच प्रक्रियांमध्ये गोंधळ झाला. आता काही नगरपालिका आणि प्रभागांची निवडणूक स्थगित करून नवीन कार्यक्रम जाहीर केला जातो आहे.