Aaditya Thackeray: ‘रोज तुमची आरती करायची होती का?’; हुकमी एक्का फुटल्यानंतर आदित्य ठाकरेंचा संताप, नेमकं काय म्हणाले?

सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या पक्षांतरावर आदित्य ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक आणि कडक शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Aaditya Thackeray: ‘रोज तुमची आरती करायची होती का?’; हुकमी एक्का फुटल्यानंतर आदित्य ठाकरेंचा संताप, नेमकं काय म्हणाले?

Aaditya Thackeray: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे वरळीचे शिलेदार आणि विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या पक्षांतरावर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक आणि कडक शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली आहे. “गेल्या चार वर्षांत स्वतःच्या स्वार्थासाठी जवळचे लोक सोडून जाणे आम्ही पाहत आलो आहोत, त्यामुळे यात काहीही नवीन किंवा धक्कादायक नाही,” असे म्हणत आदित्य ठाकरेंनी बंडखोरांवर थेट निशाणा साधला. वरळी आणि शिवडी हा भाग शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला होता आणि पुढेही राहील, असे सांगत कोणीही गेल्याने पक्षाला काहीही फरक पडत नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

एवढं सगळं दिलं, मग अजून काय आरत्या करायच्या का? आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल
पक्षांतर करणाऱ्या सचिन अहिर यांच्यावर थेट प्रहार करताना आदित्य ठाकरे यांनी म्हटलं की, “आम्ही त्यांना काहीही कमी पडू दिले नव्हते. ते स्वतः आमदार आहेत; त्यांच्या मुलीला प्रभाग समितीचे अध्यक्षपद दिले, त्यांना स्वतःला बीएसटीची (BEST) समिती दिली, भारतीय कामगार सेनेत मोठे पद दिले आणि शिवसेनेत उपनेतेपदही दिले. एवढं सगळं देऊनही अजून काय पाहिजे होते?” असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला. “जे लोक भेटत नव्हते म्हणून बोंबलतात, त्यांचे रोज माझ्यासोबतचे फोटो आहेत. रोज ते माझ्यासोबत असायचे, मग अजून काय तुमच्या आरत्या करायच्या का?” अशा शब्दांत त्यांनी आपला तीव्र संताप व्यक्त केला.

हेही वाचा – Eknath Shinde on Sachin Ahir : सचिन अहिर यांची शिवसेनेत एन्ट्री, एकनाथ शिंदे मात्र नाव विसरले, नेमकं काय म्हणाले ऐका…

संविधान बदलू पाहणाऱ्यांसोबत कसे बसू शकता? वैचारिक भूमिकेवरून घेरले
आदित्य ठाकरे यांनी केवळ अंतर्गत नाराजीच व्यक्त केली नाही, तर बंडखोर नेत्याला वैचारिक मुद्द्यांवरूनही धारेवर धरले. “उज्जैनमध्ये जमीन घोटाळा करून हिंदू मंदिरे लुटणाऱ्यांसोबत तुम्ही कशासाठी जाऊन बसता? जे लोक संसदेत दोन तृतीयांश मेजॉरिटी मिळवून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले देशाचे पवित्र संविधान बदलू पाहत आहेत, त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही कसे बसू शकता?” असा रोकडा सवाल त्यांनी अहिर यांना विचारला आहे.

हे ‘ऑपरेशन टायगर’ नाही, तर ‘ऑपरेशन देवेंद्र फडणवीस’!
या संपूर्ण राजकीय घडामोडींमागे सत्ताधाऱ्यांचा मोठा कट असल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी केला आहे. सध्याच्या या पक्षांतराला जे ‘ऑपरेशन टायगर’ असे नाव दिले जात आहे, त्याचा त्यांनी जाहीर खरपूस समाचार घेतला. “हे कसलेही ‘ऑपरेशन टायगर’ मुळीच नाही; तर हे थेट ‘ऑपरेशन देवेंद्र फडणवीस’ आहे आणि हा सगळा खेळ त्यांच्याच इशाऱ्यावर आणि नियोजनानुसार सुरू आहे,” असा खळबळजनक आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. शेवटी, कोणी कितीही प्रयत्न केले तरी शिवसेनेचा बालेकिल्ला अबाधित राहील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number