सिंधुदुर्ग : सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी देश विदेशातील पर्यटक कोकणात दाखल होत आहेत. सध्या सिंधुदुर्गमधील सर्वच किनारे पर्यटकांनी फुलले आहेत. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ला आणि शिवराजेश्वर मंदिराला भेट देत आहेत.
मोठ्या प्रमाणात पर्यटकांच्या पहिल्या पसंतीचे ठिकाण म्हणजे मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ला आणि शिवराजेश्वर मंदिर ठरत आहे. राज्यातील अनेक भागातून शैक्षणिक सहली त्याचबरोबर पर्यटक यांच्यामुळे दररोज 15 ते 20 हजार पर्यटक किल्ल्याला भेट देत आहेत.
पर्यटक समुद्राचा आनंद घेण्यासाठी सुट्टीनिमित्त सिंधुदुर्ग या ठिकाणी भेट देत आहेत. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटक कोकणाला पसंती देताना दिसतात. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे.