Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांच्या बहिणीला शिर्डी पोलिसांची नोटीस; 5 दिवसांत हजर राहण्याचे आदेश

राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर आता पोलिसांच्या रडारवर आल्या आहेत.

Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांच्या बहिणीला शिर्डी पोलिसांची नोटीस; 5 दिवसांत हजर राहण्याचे आदेश

Ashok Kharat Case: नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात याच्या गुन्हेगारी प्रकरणाने आता मोठे राजकीय वळण घेतले आहे. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी पोलिसांनी आपली चक्रे वेगाने फिरवली असून, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर आता पोलिसांच्या रडारवर आल्या आहेत. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, खरातच्या काळ्या साम्राज्यातील अनेक गुपिते उघड होण्याची शक्यता आहे.

कोट्यवधींचे ‘ट्रांजॅक्शन’ अन् पोलिसांची नोटीस
शिर्डी पोलिसांनी प्रतिभा चाकणकर यांना अधिकृत नोटीस बजावून चौकशीसाठी पाचारण केले आहे. या कारवाईमागील मुख्य कारण म्हणजे ‘समता पतसंस्थे’तील संशयास्पद व्यवहार असल्याचे सांगितले जाते. तपासादरम्यान प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलांच्या नावावर या पतसंस्थेत एकूण 4 खाती आढळली आहेत. या खात्यांमधून तब्बल 2 कोटी 40 लाख रुपयांची मोठी देवाणघेवाण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. अशोक खरातच्या बेकायदेशीर सावकारी व्यवसायातील पैसा या खात्यांमध्ये वळवण्यात आला होता का, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

5 दिवसांचा अल्टिमेटम आणि जबाबाची प्रतीक्षा
पोलिसांनी ही नोटीस चाकणकर यांच्या 2 वेगवेगळ्या पत्त्यांवर पाठवली आहे. नोटीस मिळाल्यापासून पुढील 5 दिवसांच्या आत त्यांना शिर्डी पोलीस ठाण्यात हजर राहून आपला जबाब नोंदवावा लागणार आहे. या प्रकरणात आतापर्यंत 33 जणांचे जबाब नोंदवण्यात आले असून, चाकणकर यांची चौकशी या प्रकरणातील ‘टर्निंग पॉईंट’ ठरू शकते. काळा पैसा पांढरा करण्यासाठी पतसंस्थांचा वापर झाला का, हे या चौकशीतून स्पष्ट होईल.

हेही वाचा – Baramati Byelection Supriya Sule : ‘तर वहिनींच्या प्रचाराला जाणार’; सुप्रिया सुळे सुनेत्रा पवारांच्या पाठीशी, बारामती पोटनिवडणुकीबाबत मोठं वक्तव्य

भोंदू खरातच्या पापांचा घडा भरला; कोठडीत वाढ
दुसरीकडे, नाशिकच्या विशेष तपास पथकाने (SIT) भोंदू अशोक खरातला न्यायालयात हजर केले असता, त्याच्या कोठडीत आणखी 5 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. खरातवर आतापर्यंत 12 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी एका 7 महिन्यांच्या गरोदर महिलेवर प्रसूती सुलभ होण्याचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा तिसरा गंभीर गुन्हा आता पोलिसांनी तपासासाठी हाती घेतला आहे. खरातने समता पतसंस्थेत 100 तर जगदंब पतसंस्थेत 32 बेनामी खात्यांवर स्वतःचे नाव नॉमिनी म्हणून लावल्याचेही समोर आले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number