Shashikant Shinde: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी महायुतीतील राजकीय घडामोडींवर भाष्य करत सत्ताधारी आघाडीच्या एकजुटीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजकीय गटात सध्या नाराजीचे वातावरण असल्याचा दावा करत त्यांनी महायुतीतील अंतर्गत मतभेद भविष्यात अधिक तीव्र होऊ शकतात, असे सूचित केले. पुण्यात आयोजित पक्षाच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला आतापासूनच सुरुवात करण्याचे आवाहन केले.
विलनीकरणाच्या अफवांवर स्पष्टीकरण; शरद पवारांचा शब्द अंतिम
शशिकांत शिंदे यांनी 2029 च्या विधानसभा निवडणुकीचा उल्लेख करत महायुतीतील तिन्ही पक्ष तेव्हाही एकत्र राहतील, याची खात्री देता येत नसल्याचे म्हटले. त्यामुळे विरोधी पक्षांनी राजकीय परिस्थितीचा बारकाईने अभ्यास करून संघटन अधिक मजबूत करण्यावर भर द्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांनाही उत्तर दिले. सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या विलनीकरणाच्या चर्चांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. पक्षाच्या भविष्यासंदर्भातील कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार केवळ शरद पवार यांच्याकडे असून, त्यांनी घेतलेला निर्णय संपूर्ण पक्षाला मान्य असेल, असंही शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे अफवांमुळे कार्यकर्त्यांनी संभ्रमात पडण्याचे कोणतेही कारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्याचे लक्ष्य पक्षाने ठेवले असल्याचे सांगत शिंदे यांनी संघटन विस्तारावर विशेष भर दिला. गावागावांत पक्षाची ताकद वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी अधिक सक्रिय होण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. सत्ताधारी आघाडीत सुरू असलेल्या मतभेदांचा राजकीयदृष्ट्या फायदा घेण्याची ही योग्य वेळ असल्याचेही त्यांनी सांगितले.
संघटना बांधणी वेगवान करण्याचे आवाहन
कार्यकर्त्यांनी जनतेशी थेट संपर्क वाढवावा, स्थानिक प्रश्नांवर काम करावे आणि पक्षाची भूमिका प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचवावी, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. शशिकांत शिंदे यांच्या या वक्तव्यांमुळे राज्यातील आगामी राजकीय समीकरणांबाबत नव्या चर्चांना सुरुवात झाली असून, महायुती आणि महाविकास आघाडीच्या पुढील राजकीय हालचालींकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.