Gautam Adani And Sharad Pawar : राजकारणातील 'भीष्म पितामह' शरद पवार आणि देशातील बडे उद्योजक गौतम अदानी आज एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानमध्ये उभारण्यात आलेल्या ‘शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या अत्याधुनिक केंद्राचे उद्घाटन या दोन्ही दिग्गजांच्या उपस्थितीत दिमाखात पार पडले. यावेळी अदानी यांनी शरद पवारांच्या दूरदृष्टीचे कौतुक करताना त्यांना आपले 'मेंटोर' (मार्गदर्शक) संबोधले.
'बारामती हे प्रगतीचे केंद्र' – गौतम अदानी
कार्यक्रमात बोलताना गौतम अदानी म्हणाले की, बारामती हे केवळ नकाशावरील एक गाव नसून ते परिवर्तन आणि संधींचे शक्तीकेंद्र बनले आहे. "जगातील काही ठिकाणे ही बदलाचे प्रतीक म्हणून ओळखली जातात, बारामती हे त्यापैकीच एक आहे. एक असामान्य नेते आणि माझे मार्गदर्शक शरद पवार यांच्या दूरदृष्टीमुळेच बारामती हे शहर आज अमर्याद शक्यतांचे प्रतीक बनले आहे," अशा शब्दात त्यांनी पवारांबद्दल आदर व्यक्त केला.
हेही वाचा – PMC Election : मोठी बातमी! पुणे मनपा निवडणुकीत मविआ फुटली? राष्ट्रवादीचे नेते 'नॉट रिचेबल'
गौतम भाईंनी शून्यातून विश्व निर्माण केलं – शरद पवार
गौतम अदानींच्या यशाचा प्रवास उलगडताना शरद पवार यांनीही त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. "गौतम अदानी यांनी शून्यातून सुरुवात केली. गुजरातच्या पालमापूरमधून ते रिकाम्या खिसा घेऊन मुंबईत आले. कष्ट करणाऱ्याला मुंबई कधीच उपाशी ठेवत नाही, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले," असे पवार म्हणाले. तसेच अदानी समूहाचा व्यवसाय देशातील 23 राज्यांत विस्तारलेला असून त्यांनी लाखो हातांना काम दिल्याचेही पवारांनी आवर्जून नमूद केले.
हेही वाचा – Solapur Politics: MIM ला सोलापुरात मोठे खिंडार ! 'या' बड्या नेत्याचा राजीनामा
भविष्यातील रोजगाराचा 'एआय' मंत्र
या सेंटरच्या माध्यमातून भविष्यात आणखी लाखो तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतील, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही प्रमुख उपस्थिती होती. राजकीय मतभेद बाजूला ठेवून विकासाच्या मुद्द्यावर हे सर्व दिग्गज एकत्र आल्याने या कार्यक्रमाची चर्चा राज्यभर सुरू आहे.