‘Shaktipeeth Highway राधानगरीमार्गे सिंधुदुर्गात वळवा;’ कणकवलीच्या नगराध्यक्षांचा जिल्ह्याच्या विकासासाठी नवा प्लॅन

शक्तीपीठ महामार्गात बदल करून तो राधानगरीमार्गे थेट सिंधुदुर्ग जिल्ह्यात उतरवण्यात यावा, असा प्रस्ताव कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी मांडला आहे.

‘Shaktipeeth Highway राधानगरीमार्गे सिंधुदुर्गात वळवा;’ कणकवलीच्या नगराध्यक्षांचा जिल्ह्याच्या विकासासाठी नवा प्लॅन

Shaktipeeth Mahamarg Sandesh Parkar Demand : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या आराखड्यात आतापर्यंत अनेक बदल करण्यात आले आहेत. अनेक जिल्ह्यामधून शक्तीपीठ महामार्गाला मोठा विरोध झाला आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी या महामार्गाला विरोध करताना स्वतःच्या जमिनी देण्यास साफ नकार दिला आणि आंदोलनेही केली. मात्र, आता शक्तीपीठ महामार्गात बदल करून तो राधानगरीमार्गे थेट सिंधुदुर्ग जिल्ह्यात उतरवण्यात यावा, असा प्रस्ताव कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी मांडला आहे. सध्याच्या नियोजनानुसार हा महामार्ग थेट गोव्याला जोडला गेल्यास सिंधुदुर्ग केवळ एक 'ट्रान्झिट पॉईंट' ठरेल आणि पर्यटनातून मिळणाऱ्या उत्पन्नाचे मोठे नुकसान होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. 

प्रवासाचा वेळ वाचवून रोजगाराला मिळणार चालना
कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पारकर यांनी स्पष्ट केले की, हा प्रकल्प महाराष्ट्र शासनाचा असल्याने त्याचा सर्वाधिक फायदा राज्यातील जिल्ह्यांना आणि स्थानिक व्यापाराला मिळणे आवश्यक आहे. राधानगरी ते सिंधुदुर्ग हे अंतर केवळ 30 किलोमीटर असून हा मार्ग NH 66 ला जोडल्यास कोल्हापूर ते सिंधुदुर्ग हे प्रवासाचे अंतर अवघ्या 1 ते 1.5 तासांवर येऊ शकते, असा दावा पारकर यांनी केला आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी समांतर नवीन ग्रीनफिल्ड मार्ग विकसित करून तो बांद्यापर्यंत नेल्यास दुर्गम भागातील गावांचा विकास होईल आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. संकेश्वर-रेड्डी चौपदरीकरण आणि घोटगे-पाटगाव मार्गाशी या महामार्गाची सांगड घातल्यास दळणवळणाची एक मोठी यंत्रणा कोकणात उभी राहू शकते, ज्याचा फायदा कणकवली, ओरोस आणि कुडाळ सारख्या शहरांना होईल.

हेही वाचा – Chandoli National Park Safari : चांदोली सफारी आता महागली; वन विभागाकडून पर्यटन शुल्कात वाढ, पर्यटकांसाठी नवीन नियमावली

पर्यटन आणि धार्मिक स्थळांची कनेक्टिव्हिटी
हा महामार्ग राधानगरीमार्गे आल्यास दक्षिण कोकणातील पर्यटन आणि धार्मिक स्थळांच्या विकासाला गती मिळेल. यामध्ये प्रामुख्याने सिंधुदुर्ग किल्ला, विजयदुर्ग, आंबोली आणि दाजीपूर अभयारण्य यांसारखी महत्त्वाची स्थळे महामार्गाशी जोडली जातील. तसेच आंगणेवाडी, कुणकेश्वर आणि माणगाव या धार्मिक केंद्रांना भेट देणाऱ्या भाविकांसाठी हा मार्ग सोयीचा ठरेल. चिपी विमानतळ, देवगड आणि रेड्डी बंदर या पायाभूत सुविधांना महामार्गाची जोड मिळाल्यास संपूर्ण जिल्ह्याचे आर्थिक चित्र बदलू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्राच्या आर्थिक हिताला प्राधान्य
संदेश पारकर यांनी आपल्या मागणीत 'महाराष्ट्राचे हित' हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवला आहे. "पर्यटक जर सिंधुदुर्ग टाळून थेट गोव्याला गेले, तर जिल्ह्याचे मोठे आर्थिक नुकसान होईल," असे त्यांनी नमूद केले. त्यामुळे सावंतवाडी आणि जिल्ह्याच्या सीमेवर हा महामार्ग उतरवून तेथून पर्यटकांना सिंधुदुर्गातील विविध ठिकाणांकडे वळवण्याचे नियोजन असायला हवे. महाराष्ट्राच्या हक्काचा पैसा राज्यातच जिरण्यासाठी आणि कोकणच्या शाश्वत विकासासाठी ही नवीन आखणी अनिवार्य असल्याचे त्यांनी राज्य सरकारला सुचवले आहे.

हेही वाचा – MSRTC Solar Energy Project: आता ST महामंडळ करणार वीज निर्मिती; वर्षाला वाचणार कोट्यवधी रुपये, परिवहन मंत्र्यांनी केली 'ही' मोठी घोषणा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number