Crop Loss Compensation: जळगाव जिल्ह्यामध्ये नुकत्याच झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या (कॅबिनेट) बैठकीत जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील नुकसानीचा सविस्तर अहवाल मांडला. जळगाव जिल्ह्यात गत 23 मे ते 6 जून या कालावधीत आलेल्या भीषण वादळ आणि पावसामुळे जवळपास 7,142 हेक्टर जमिनीवरील केळीच्या बागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याची माहिती त्यांनी दिली. सध्या बाजारपेठेत केळीला प्रति क्विंटल 3,000 ते 3,200 रुपये इतका चांगला भाव मिळत आहे. शेतकऱ्यांना या पिकातून उत्तम आर्थिक उत्पन्न मिळण्याची आशा असतानाच ऐनवेळी आलेल्या या नैसर्गिक आपत्तीने केळी उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
विमा कंपन्यांकडून तात्काळ मदतीची मागणी
या गंभीर परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी कॅबिनेट बैठकीत मंत्री गुलाबराव पाटील आणि नामदार संजय सावकारे यांनी आक्रमक भूमिका घेतली. “भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून बाधित शेतकऱ्यांना त्वरित भरपाई मिळायला हवी,” अशी आग्रही मागणी त्यांनी केली. अनेकदा सरकारी पोर्टलवर क्षेत्र दाखवले जात असूनही तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत मिळत नाही. ही त्रुटी दूर करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर आणि थेट मदत पोहोचवण्यात यावी, अशी विनंती त्यांनी सरकारला केली.
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे कृषिमंत्र्यांसोबत विशेष बैठकीचे आदेश
शेतकऱ्यांची ही गंभीर समस्या लक्षात घेऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने पावले उचलली आहेत. या विषयावर अंतिम निर्णय घेण्यासाठी कृषिमंत्र्यांसोबत एक विशेष बैठक आयोजित करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या बैठकीला मंत्री गुलाबराव पाटील, संजय सावकारे यांच्यासह जिल्ह्यातील आमदार चंद्रकांत पाटील, आमदार जावळे आणि इतर लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. “येत्या काही दिवसांतच ही बैठक पार पडेल. यापूर्वीच्या संकटकाळात सरकारने केळी उत्पादक शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे मोठी आर्थिक मदत दिली होती, तशीच भरीव मदत याही वेळी मिळेल,” असा ठाम विश्वास गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.