Operation Tiger: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या वेगवान घडामोडींमध्ये आता एका नव्या गुप्त ठिकाणाचा उलगडा झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार फुटल्याने पक्षाला मोठा धक्का बसला असून, या बंडखोर सदस्यांना दिल्लीतून अज्ञात स्थळी हलवण्यात आले होते. हे लोकप्रतिनिधी सध्या नेमके कुठे आहेत, याबद्दल राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता होती. अखेर ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत या खासदारांचे अचूक लोकेशन जाहीर केले आहे. या बंडखोरांना राजस्थानमधील एका अत्यंत सुरक्षित आणि व्हीआयपी ठिकाणी ठेवण्यात आल्याची माहिती राऊत यांनी दिली. सुरक्षेच्या नावाखाली या सर्व खासदारांना केंद्र सरकारकडून 'Y+' (वाय प्लस) आणि सीआरपीएफची (CRPF) कडक सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे.
राऊतांचा पैशांच्या व्यवहारावर थेट हल्लाबोल
दरम्यान, पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी या बंडखोरीमागील आर्थिक उलाढालीचा थेट आकडा जाहीर केला. ते म्हणाले की, बंडखोर खासदारांना एकूण 25 कोटी रुपये मिळार असून, काल रात्री 10 वाजता त्यांना प्रत्येकी 10 कोटी रुपयांची रोख रक्कम वितरीत करण्यात आली आहे. "जर तुम्ही कोणतीही गद्दारी केली नाही आणि तुम्हाला जनतेची भीती नाही, तर मग तुमच्या घरांवर, मालमत्तांवर आणि स्वतःच्या सुरक्षेसाठी केंद्रीय यंत्रणांचा गराडा का दिला आहे?" असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मुलाभोवती असलेल्या कडेकोट सुरक्षेवरही त्यांनी यावेळी जोरदार आक्षेप घेतला.
हेही वाचा – Operation Tiger : राजकीय घडामोडींना वेग; सहा खासदारांना 'Y+' दर्जाच्या समकक्ष स्थानिक सुरक्षा
गिरीश महाजन यांच्या आव्हानाला चोख प्रत्युत्तर
तथापि, भाजप नेते गिरीश महाजन यांनी खासदारांच्या फुटीवरून केलेल्या वक्तव्याचा संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला. महाजन यांच्या आव्हानाला उत्तर देताना राऊत म्हणाले, "तुम्ही पोलीस, ईडी आणि सीबीआय सारख्या खाकी वर्दीच्या बळावर आम्हाला मस्ती दाखवत आहात. जर हिंमत असेल तर सरकारी सुरक्षा बाजूला ठेवून समोरासमोर या." पुढे बोलताना त्यांनी एक मोठी अट ठेवली की, जर केवळ अर्धा तासासाठी ईडी किंवा सीबीआयचे नियंत्रण ठाकरे गटाला मिळाले, तर सर्वात आधी गिरीश महाजन हेच पक्ष सोडून आमच्या बाजूने उभे राहिलेले दिसतील. कुंभमेळ्याच्या कंत्राटातील कथित गैरव्यवहारांची यादी आपल्याकडे तयार असल्याचा इशारा देत राऊत यांनी विरोधकांवर राजकीय बाण चालवले आहेत.