Sanjay Shirsat PC on Shiv Sena MP Defection : ठाकरे गटातील (उबाठा) 6 खासदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या संभाव्य फुटीवर भाष्य करताना शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या नेतृत्वावर जोरदार हल्लाबोल केला. शिरसाट म्हणाले की, ‘उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील खासदार जर बाजूला होत असतील, तर त्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांना पक्षात मिळणारी वागणूक आहे.’ पक्षात लोकप्रतिनिधींना योग्य तो सन्मान दिला गेला नाही किंवा त्यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित केले गेले नाहीत, हाच या संपूर्ण परिस्थितीचा परिणाम असल्याचा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला.
खासदार खरेदीच्या 50 कोटींच्या आरोपांवर शिरसाटांचे प्रत्युत्तर
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ‘शिवसेना खासदारांना प्रत्येकी 50 कोटी रुपयांची लाच दिली जात असून, त्यापैकी 15 कोटी रुपयांची रक्कम ‘अॅडव्हान्स’ म्हणून आधीच पोहचवण्यात आली आहे’; असा गंभीर आरोप केला होता. या आरोपांचा समाचार घेताना संजय शिरसाट यांनी उपरोधिकपणे सवाल केला की, ‘तुमचे खासदार कुठे आहेत हे तुम्ही आम्हाला काय विचारता? जर तुमचे खासदार तुमच्या सोबत असतील, तर तुम्हाला इतरांकडे चौकशी करण्याची काय गरज आहे?’ शिरसाट म्हणाले की, लोकप्रतिनिधींवर असे बिनबुडाचे आरोप करून ठाकरे गट स्वतःचेच हसे करून घेत आहे. ‘तुमचे खासदार कुठे आहेत हे तुम्ही आम्हाला विचारण्यापेक्षा तुमचे तुम्हीच शोधून काढा,’ असा टोलाही त्यांनी लगावला.
लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रावरून टीका
पक्षातील अंतर्गत वादाचे खापर इतरांवर फोडण्याऐवजी ठाकरे गटाने स्वतःच्या कार्यपद्धतीचे आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला शिरसाट यांनी दिला. ‘खासदार फुटीच्या भीतीने उबाठा पक्षाने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून आपली बाजू मांडण्याची विनंती केली आहे, पण ओम बिर्ला काय त्यांना पत्र लिहून सांगणार आहेत का, की तुमचे किती खासदार कुठे गेले?’ असा खोचक प्रश्न शिरसाट यांनी उपस्थित केला. स्वतःच्या पक्षातील नेत्यांवर आणि खासदारांवर विश्वास नसल्यानेच ठाकरे गटाचे नेते आता केवळ आरोप करून स्वतःची कातडी वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले.
19 जूनच्या प्रवेशावर आणि ‘सामना’च्या टिकेवर भाष्य
येत्या 19 जून रोजी ठाकरे गटाचे काही खासदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात असून, याविषयीचे चित्र लवकरच स्पष्ट होईल असे संकेतही राजकीय वर्तुळातून मिळत आहेत. दुसरीकडे, ‘सामना’च्या अग्रलेखातून बंडखोरांना ‘बेईमान’ संबोधत करण्यात आलेल्या टीकेलाही शिरसाट यांनी उत्तर दिले. पूर्वीच्या बंडखोरीचा दाखला देत शिरसाट यांनी स्पष्ट केले की, आपल्या कार्यकर्त्यांना आणि लोकप्रतिनिधींना आपला माणूस म्हणून वागवले नाही तर असे परिणाम समोर येतात. ठाकरे गटाने इतर पक्षांवर आरोप करण्यापेक्षा आपल्या खासदारांमधील अंतर्गत असंतोष आधी मिटवावा, असे आव्हान त्यांनी दिले.