Sanjay Raut On Eknath Shinde: शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा आज शिवाजी पार्क येथे पार पडत आहे. या दसरा मेळाव्याला संबोधित करताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी संजय राऊत म्हणाले की, 'शस्त्र पूजन करण्याचा अधिकार हा फक्त हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनाच आहे. मला कोणातरी विचारलं की, मिंधे गट आज कशाची पूजा करणार? मी म्हटलं त्यांनी दिल्लीवर अमित शाहांचे जोडे आणले आहेत. ते अमित शाहांच्या चपलांची पूजा करणार आहेत.'
संजय राऊत पुढे म्हणाले की, दसरा मेळावा चिखलात कसा घेणार? अशी अनेकांनी विचारणा केली. परंतु हा ओला दसरा मेळावा आहे आणि तो मेळावा शिवसेनेतून फुटून गेलेल्या गद्दारांच्या तोंडावर चिखल फेकून मारण्याचा उत्सव आहे. आपण शिवतीर्थावर उभे आहोत आणि येथून जवळच अजून एक शिवतीर्थ आहे ते देखील आपलेच मानायला हवे, असं सूचक वक्तव्यही संजय राऊत यांनी केलं आहे.
दरम्यान, संजय राऊत यांनी सांगितलं की, भर पावसामध्ये चिखलामध्ये हजर असलेले निष्ठावंत शिवसैनिक आहे. 68 वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुखांनी जी ठिणगी टाकली आहे. ती ठिणगी मुसळधार पाऊस सुद्धा विझवू शकत नाही. मराठवाडा 8 दिवस पाण्यात आहे. आता आपल्याला 2 तास पाण्यात मेळावा घ्यावा लागला. त्यामुळे हा आपला ओला मेळावा आहे.