Sam Pitroda Serious Allegations : ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी एका मुलाखतीत मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यांदरम्यान भारतीय दूतावासाकडून त्यांच्यावर पाळत ठेवली जाते आणि विदेशी नेत्यांना त्यांना भेटण्यापासून रोखले जाते, असा दावा पित्रोदा यांनी केला आहे.
परदेशातील देखरेख आणि हेरगिरीचा दावा
सॅम पित्रोदा यांनी दावा केला की, राहुल गांधी जेव्हा परदेशात जातात, तेव्हा हॉटेलपासून ते विमानतळापर्यंत भारतीय दूतावासाचे अधिकारी त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून असतात. "लिखित पुरावे नसले तरी, अनेक लोकांनी आम्हाला सांगितले आहे की, दूतावासातून त्यांना फोन करून राहुल गांधींना न भेटण्याच्या सूचना दिल्या जातात," असे पित्रोदा म्हणाले. राहुल गांधींच्या जर्मनी दौऱ्याच्या टायमिंगवरून होणारी टीकाही त्यांनी फेटाळून लावली. हा दौरा अचानक नसून 110 देशांच्या लोकशाही पक्षांच्या 'प्रोग्रेसिव्ह अलायन्स' बैठकीसाठी अनेक महिने आधीच नियोजित होता, असे त्यांनी स्पष्ट केले.
लोकशाही आणि संस्थांच्या दबावाबाबत चिंता
भारतातील लोकशाही संस्था सध्या दबावाखाली असून त्यांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप पित्रोदा यांनी केला. जर्मनीतील उदाहरणे देत त्यांनी भारतीय निवडणूक प्रणालीवरही प्रश्न उपस्थित केले. जर्मनीमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केवळ पेपर बॅलेटद्वारे निवडणुका होतात, मात्र भारतात ईव्हीएम (EVM) आणि निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेबाबत लोकांच्या मनात शंका असल्याचे त्यांनी नमूद केले. "सत्य देशात बोलले काय किंवा परदेशात, ते सत्यच असते; यात दुटप्पीपणा असू शकत नाही," असे सांगत त्यांनी राहुल गांधींच्या विधानांचे समर्थन केले.
शेजारील देश आणि अल्पसंख्याकांवरील हिंसाचार
बांगलादेशातील हिंसाचारावर भाष्य करताना पित्रोदा म्हणाले की, भारताने जर 'विश्वगुरू' बनायचे असेल, तर प्रथम आपल्या शेजारील देशांमध्ये (नेपाळ, श्रीलंका, पाकिस्तान) शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. ख्रिश्चन, मुस्लिम किंवा दलित अशा कोणत्याही समुदायाविरुद्ध होणारा हिंसाचार हा द्वेषाचा परिणाम असून यामुळे भारताची जागतिक प्रतिमा डागाळते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. नाताळच्या काळात चर्चवर होणारे हल्ले ही चिंतेची बाब असल्याचेही त्यांनी सांगितले.
'जी-राम-जी' कायदा आणि धर्माचे राजकारण
'मनरेगा'ची जागा घेणाऱ्या 'जी-राम-जी' कायद्याच्या नामांतरावर पित्रोदा यांनी तीव्र आक्षेप घेतला. "महात्मा गांधींच्या नावाऐवजी रामाचे नाव वापरण्याची काय गरज होती? पंतप्रधान हे एका विशिष्ट समुदायाचे नसून संपूर्ण देशाचे असतात," असे त्यांनी ठणकावून सांगितले. धर्म ही वैयक्तिक श्रद्धेची बाब असली पाहिजे, ती शासनाची प्राथमिकता असू शकत नाही, असे मत त्यांनी मांडले.
जागतिक अर्थव्यवस्था आणि चीनचे वर्चस्व
जागतिक अर्थव्यवस्थेवर बोलताना त्यांनी चीनच्या वाढत्या प्रभावाबद्दल धोक्याचा इशारा दिला. इलेक्ट्रिक वाहने, बॅटरी, ड्रोन आणि रोबोटिक्स यांसारख्या तंत्रज्ञानावर चीनचा ताबा आहे. जर उत्पादनाची एकाधिकारशाही (Monopoly) केवळ एकाच देशाकडे राहिली, तर भविष्यात नोकऱ्यांची मोठी समस्या निर्माण होईल आणि आर्थिक विषमता वाढेल, असे ते म्हणाले. जॉर्ज सोरोस यांच्याकडून काँग्रेसला फंडिंग मिळत असल्याच्या आरोपांना त्यांनी ही सर्व थेट 'फालतू बडबड' असल्याचे ठरवत फेटाळून लावले.
हेही वाचा – Bangladesh Violence: मोहम्मद युनूसची ती एक चूक, ज्याची किंमत आज बांगलादेश मोजतोय