Russian model Video Viral : सोशल मीडियावर सध्या एका रशियन मॉडेलचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून, यामध्ये तिने स्वतःचा विनयभंग करणाऱ्या विकृताला जागीच धडा शिकवल्याचे पाहायला मिळत आहे. सार्वजनिक ठिकाणी रील शूट करत असताना एका व्यक्तीने तिला अयोग्य पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, ज्यावर मॉडेलने आक्रमक पवित्रा घेत त्याला चोप दिला. या घटनेमुळे इंटरनेटवर महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तसेच, महिलांना अशा मानसिकतेचा कसा सामना करावा लागतो, हे यातून पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे.
भररस्त्यात विनयभंगाचा प्रयत्न
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मोनिका नावाची एक रशियन मॉडेल रस्त्यावर उभी राहून आपले रील शूट करत होती. ती कॅमेऱ्यासमोर पोझ देत असतानाच अचानक एक अनोळखी व्यक्ती तिच्या जवळ आली. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, त्या व्यक्तीने मोनिकाच्या जवळ जाऊन तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा आणि लगट करण्याचा प्रयत्न केला. या अनपेक्षित प्रकारामुळे मोनिका सुरुवातीला दचकली, मात्र तिने क्षणाचाही विलंब न लावता त्या व्यक्तीला चोप देण्यास सुरुवात केली.
धाडसीपणे शिकवला धडा
मोनिकाने केवळ आरडाओरडा न करता त्या विकृत व्यक्तीला शारीरिकरित्या प्रतिकार केला. तिने त्या व्यक्तीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले आहे. हा सर्व प्रसंग तिथे उपस्थित असलेल्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला असून, काही तासांतच हा व्हिडिओ विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 1 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. स्वतःचे संरक्षण करण्यासाठी मॉडेलने दाखवलेल्या या हिमतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. सोशल मीडियावर वारंवार अशा घटनांचे व्हिडिओ समोर येत असल्याने महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
सोशल मीडियावर समर्थनाचा ओघ
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटीझन्सनी मॉडेलच्या धाडसाला दाद दिली आहे. अनेकांनी "महिलांशी गैरवर्तन करणाऱ्यांना असाच धडा शिकवला पाहिजे" अशा कमेंट्स केल्या आहेत. काहींनी हा व्हिडिओ शेअर करताना सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. "स्वसंरक्षण ही काळाची गरज आहे आणि मोनिकाने दिलेले उत्तर योग्यच होते," असे मत अनेक युजर्सनी व्यक्त केले आहे. या घटनेमुळे अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तींना जरब बसेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. अशा घटनांमध्ये केवळ कायदेशीर कारवाई पुरेशी नसून, समाजानेही अशा विकृतींविरुद्ध उभे राहणे गरजेचे असल्याचे या व्हायरल व्हिडिओच्या निमित्ताने बोलले जात आहे.