US-Iran War : इराण-अमेरिका युद्धात पुतीन यांची चांदी! तर, चीनचे अतोनात नुकसान; पण कसे?

पश्चिम आशियातील तणाव आणि हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील संभाव्य बंदीमुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.

US-Iran War : इराण-अमेरिका युद्धात पुतीन यांची चांदी! तर, चीनचे अतोनात नुकसान; पण कसे?

US-Iran War : अमेरिका आणि इराण यांच्यात भडकलेल्या युद्धामुळे जागतिक राजकारणाची आणि अर्थकारणाची समीकरणे वेगाने बदलत आहेत. या संघर्षात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे 'छुपे विजेते' ठरले असून, रशियाला विशेष काहीच न करता मोठा आर्थिक फायदा होत आहे. दुसरीकडे, चीनला मात्र या युद्धामुळे अब्जावधी डॉलर्सचा फटका बसला असून भारतासारख्या तेल आयातदार देशांसमोरही नवीन आव्हाने उभी राहिली आहेत.

कच्च्या तेलाचे दर भडकले आणि रशियाचा फायदा
पश्चिम आशियातील तणाव आणि हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील (Strait of Hormuz) संभाव्य बंदीमुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. कच्च्या तेलाचा दर आता प्रति बॅरल 110 डॉलर्सच्या पुढे गेला आहे. ज्या रशियावर युक्रेन युद्धामुळे अमेरिकेने निर्बंध घातले होते, त्याच रशियाच्या तेलाची मागणी आता अचानक वाढली आहे. जागतिक तेल पुरवठा विसकळीत होऊ नये म्हणून खुद्द अमेरिकेनेही रशियाच्या तेलावरील निर्बंध शिथिल केले आहेत. रशियाने या संधीचा फायदा घेत आपल्या तेलावरील सवलत कमी केली आहे. 28 फेब्रुवारी 2026 पूर्वी रशिया प्रति बॅरल 10 ते 13 डॉलर्स सवलत देत होता, ती आता केवळ 4 ते 5 डॉलर्सवर आली आहे. दरम्यान, जगभरात निर्बंध लादून रशियाला खड्ड्यात पाडायला निघालेल्या अमेरिकेलाही पाऊल मागे घ्यावे लागले आहे. यामुळे रशियन सरकारची तिजोरी भरणे आता अमेरिका रोखू शकत नाही.

भारतीय तेल कंपन्यांना सवलतीचा फटका
रशियाने सवलत कमी केल्याचा थेट परिणाम भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्यांवर झाला आहे. फेब्रुवारी महिन्यात HPCL सारख्या भारतीय कंपन्यांनी रशियाकडून 13 डॉलर्सच्या सवलतीत दोन कार्गो तेल खरेदी केले होते. मात्र, आता ही मोठी सवलत बंद झाल्याने भारतीय रिफायनरींना महागडे तेल खरेदी करावे लागत आहे. केवळ भारतच नाही, तर युरोपीय देशही आता नाईलाजास्तव रशियाच्या तेलाकडे वळत आहेत, ज्यामुळे रशियाची सरकारी तिजोरी वेगाने भरत आहे. यापूर्वी अमेरिकेने रशियन तेलाच्या खरेदीवर भारतावर 25 टक्के टॅरिफ लावला होता, मात्र आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे.

हेही वाचा – ESMA Act : LPG सिलेंडरवर तोडगा काढण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; देशभरात लागू करणार ESMA कायदा

चीनला बसला 400 अब्ज डॉलर्सचा मोठा दणका
या युद्धाचा सर्वाधिक फटका चीनला बसला आहे. इराणच्या एकूण तेल निर्यातीपैकी 90 टक्के तेल एकट्या चीनला जात होते, जे चीनला मोठ्या सवलतीत मिळत असे. युद्धामुळे हा स्वस्त तेलाचा पुरवठा आता पूर्णपणे बंद झाला आहे. याशिवाय, मार्च 2021 मध्ये चीन आणि इराण दरम्यान झालेल्या मोठ्या भागीदारी करारानुसार चीनने इराणमध्ये प्रचंड गुंतवणूक केली होती. आता इराणमधील चीनचे सुमारे 400 अब्ज डॉलर्स या युद्धामुळे अडकले आहेत. अमेरिकेच्या शत्रू देशांशी मैत्री करण्याचे धोरण सध्या चीनच्या अंगलट आले आहे.

बदलते जागतिक समीकरण
इराण-अमेरिका संघर्षामुळे रशियाला आर्थिक बळ मिळाले असून पुतीन यांनी या संकटाचे संधीत रूपांतर केले आहे. चीनने गेल्या काही दशकांत इराणमध्ये केलेली मोठी गुंतवणूक आता धोक्यात आली आहे. हॉर्मुझ सामुद्रधुनीतील अनिश्चिततेमुळे जागतिक ऊर्जा सुरक्षा धोक्यात आली असून, इंधनाचे वाढते दर विकसित आणि विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थेवर मोठा दबाव निर्माण करत आहेत. रशियाची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी हे युद्ध एक 'वरदान' ठरले आहे, तर चीनसाठी हा एक मोठा धोरणात्मक पराभव मानला जात आहे.

हेही वाचा – Iran Warns America: 'तेलाचा थेंबही बाहेर जाऊ देणार नाही…', अमेरिकेच्या धमकीला इराणचे सडेतोड उत्तर, पण आता परिणाम जगाला भोगावे लागणार?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number