Chandrakant Khaire: शिवसेना ठाकरे गटाने बोलावलेल्या महत्त्वाच्या बैठकीला 9 पैकी 6 खासदारांनी गैरहजर राहून बंडखोरीचे संकेत दिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. खासदार संजय राऊत यांनी बंडखोरांना प्रत्येकी 50 कोटी रुपयांचे आमिष आणि 15 कोटी रुपयांची आगाऊ रक्कम (टोकन) दिल्याचा आरोप केला होता. मात्र, ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी याहूनही मोठा आणि धक्कादायक दावा केला आहे. राऊत यांनी सांगितलेला आकडा तर खूपच कमी असून, प्रत्यक्षात या संपूर्ण फोडाफोडीसाठी कोट्यवधी रुपयांची प्रचंड मोठी डील झाल्याचा आरोप खैरे यांनी केला आहे.
मराठवाड्यातील कंत्राटदाराकडे 600 कोटींची जबाबदारी
चंद्रकांत खैरे यांनी थेट पैशांचा आकडा जाहीर करत 'ऑपरेशन टायगर'च्या पडद्यामागील सूत्रधारांचा पर्दाफाश केला आहे. महिनाभरापूर्वी रेल्वे प्रवासादरम्यान एका व्यक्तीने दिलेल्या माहितीचा हवाला देत खैरेंनी सांगितले की, ठाकरे गटाचे खासदार फोडण्यासाठी मराठवाड्यातील एका बड्या कंत्राटदाराला तब्बल 600 कोटी रुपयांची मोठी जबाबदारी देण्यात आली होती. बंडखोर खासदारांना मिळालेली रक्कम ही 50 कोटींपेक्षा कितीतरी पटीने जास्त असल्याचा दावा त्यांनी केला. गद्दारी करणाऱ्या या खासदारांना जनता कधीही माफ करणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया देत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची आठवण करून दिली. "शिवसैनिकांच्या आणि उद्धव ठाकरेंच्या कष्टावर नागरिक मतदान करतात आणि हे लोक निवडून आल्यावर गद्दारी करतात, अशा गद्दारांना थेट तुडवण्याचाच आदेश बाळासाहेबांनी दिला होता आणि आज तोच लागू होतो," अशा आक्रमक शब्दांत खैरेंनी आपला संताप व्यक्त केला.
ईमेल, व्हॉट्सॲप आणि थेट पत्र पाठवूनही खासदार गैरहजर
दिल्लीतील बैठकीला व्हिप बजावूनही अनुपस्थित राहिलेल्या 6 खासदारांवर आता कायदेशीर कारवाईची टांगती तलवार आहे. खैरे यांनी स्पष्ट केले की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सर्व खासदारांना ईमेल, व्हॉट्सॲप आणि त्यांच्या घरी थेट पत्राद्वारे बैठकीची पूर्वकल्पना व आदेश देण्यात आले होते. हे समन्स मिळूनही त्यांनी हेतुपुरस्सर दांडी मारली. हा थेट पक्षाशी आणि मतदारसंघातील जनतेशी केलेला द्रोह असून, मशालीच्या चिन्हावर निवडून आलेल्या या सर्व 6 बंडखोरांवर कठोर कायदेशीर पावले उचलली जातील.
22 आमदारांना घेऊन भाजपच्या दारात गेल्याचा खैरे यांचा आरोप
दरम्यान, मंत्री उदय सामंत यांनी सोशल मीडियावर केलेल्या उपरोधिक पोस्टचा समाचार घेताना खैरेंनी त्यांच्या जुन्या आठवणी काढल्या. उदय सामंत हे पूर्वी 22 आमदारांना सोबत घेऊन भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत होते, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. एकनाथ शिंदेंना पाहताच सामंत कसे घाबरले आणि मांजरासारखे गुपचूप जाऊन सामील झाले, असा टोला त्यांनी लगावला. "डोळे झाकून दूध पिणाऱ्या मांजरासारखी त्यांची अवस्था असून, त्यांनी जास्त बडबड करू नये. त्यांचा सगळा रेकॉर्ड आम्हाला ठाऊक आहे," असा सज्जड इशाराही खैरेंनी दिला.