Rohit Pawar Hunger Strike : शेतकर्यांचा सातबारा कोरा करावा यामागणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे आक्रमक झाले आहेत. त्यांनी सरसकट कर्जमाफीसाठी अन्नत्याग आंदोलनाची हाक दिली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आणि त्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी यासाठी पंढरपूरच्या पवित्र भूमीत एक मोठे आंदोलन पुकारण्यात आले आहे. विठुरायाच्या चरणी नतमस्तक होत रोहित पवार यांच्यासह आंदोलकांनी आजपासून आपले ‘अन्नत्याग आंदोलन’ अधिकृतपणे सुरू केले आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र उभा असून, जोपर्यंत सरकार मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशारा यावेळी त्यांनी दिला.
‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग’: सरकारला गुडघ्यावर आणण्याचा निर्धार
या आंदोलनाचे मुख्य उद्दिष्ट सरकारला जागे करणे आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळवून देणे हे आहे. आंदोलकांनी सरकारला इशारा दिला आहे की, आम्ही सर्वजण मिळून या सरकारला गुडघ्यावर आणू आणि कर्जमाफीच्या ज्या जाचक अटी मुद्दामहून टाकण्यात आल्या आहेत, त्या मागे घेण्यास भाग पाडू. सध्या दिलेल्या कर्जमाफीमुळे शेतकऱ्याला लाख रुपये मिळणार असले तरी 36 लाख शेतकर्यांना अडचण निर्माण होऊ शकते. कर्जमाफी मिळवण्यासाठी आधी 50 हजार रुपये भरावे लागणार आहेत. मग शेतकऱ्याला दोन लाख रुपये मिळणार आहेत असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. ही जाचक अट रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करून 55 लाख शेतकर्यांना कर्जमाफी सरकारने द्यावी अशी मागणी त्यांनी केली. कर्जमाफी पाहिजे, कर्ज वसूली आम्हाला नको आहे यासाठीचे आंदोलन आहे असे आमदार रोहित पवारांनी स्पष्ट केले.
लातूरच्या घटनेचा दाखला: ‘बैलही आजारी आणि कर्जमाफीही आजारी’
भाषणादरम्यान रोहित पवारांनी लातूर जिल्ह्यातील एका हृदयद्रावक घटनेचा उल्लेख केला. काही दिवसांपूर्वी लातूरमध्ये बैल नसल्यामुळे एका शेतकऱ्याला आपल्या स्वतःच्या पत्नीला नांगराला जुंपून शेती करावी लागली होती. ही बातमी मीडियामध्ये आल्यावर आणि विरोधकांनी आवाज उठवल्यावर सरकारने दुसऱ्या दिवशी त्या शेतकऱ्याला एक बैल दिला; मात्र तो बैलही आजारी होता. त्या गरीब शेतकऱ्याला स्वतः पैसे नसताना बाहेरून कर्ज काढून त्या आजारी बैलाच्या उपचारासाठी डॉक्टरांचे पैसे भरावे लागले. ‘जसा तो बैल आजारी आहे, तशीच सरकारची ही कर्जमाफी योजनासुद्धा आजारी आहे,’ असा टोला रोहित पवारांनी लगावला. आम्हाला फक्त दाखवण्यासाठी कर्जमाफी नको तर मनापासून केलेली मदत हवी आहे, अशी मागणी त्यांनी केली.
‘ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारल्याशिवाय देशाचा विकास अशक्य’
या आंदोलनात तब्बल 36 लाख शेतकऱ्यांच्या वतीने सरकारकडे आर्त हाक घालण्यात आली आहे. जोपर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळत नाही, तोपर्यंत शेतमजुराला न्याय मिळणार नाही आणि ग्रामीण अर्थव्यवस्थाही सुधारणार नाही. ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत राहिली तरच शहरांची, राज्याची आणि देशाची अर्थव्यवस्था चांगली राहू शकते, याकडे त्यांनी सरकारचे लक्ष वेधले. रोहित पवार यांच्या आंदोलनामुळे सरसकट कर्जमाफीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सरकार याप्रकरणी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा द्या
शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. अनेक वर्षांपूर्वी साने गुरुजी यांनी सुद्धा पंढरपुरात विनापरवानगीचे आंदोलन केलं होतं. त्यावेळेस त्यांना यश आलं होतं. आम्ही सुद्धा त्यांच्याच आणि महापुरुषांच्या विचारानेच पुढे जात आहोत. त्यामुळे परवानगी दिली काय आणि नाही दिली काय आम्ही आंदोलन करणारच असे रोहित पवारांनी सांगितले.