Asim Sarode on BJP MLA Suresh Dhas : बीड जिल्ह्यात मोठा भूखंड घोटाळा आणि प्राणघातक हल्ल्याची धक्कादायक मालिका समोर आली आहे. 1000 कोटी रुपयांच्या जमिनीच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला असून त्यांची प्रकृती सध्या नाजूक आहे. या प्रकरणात वकील असीम सरोदे यांनी धक्कादायक आरोप करत सांगितले की, 'राम खाडे यांनी मला म्हटलं आहे की, तुमच्याही जीवाला धोका आहे. कारण, तुम्ही माझे वकील आहात.'
1000 कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप
काही दिवसांपूर्वी राम खाडे यांनी देवस्थानच्या जमिनी बेकायदेशीररित्या खाजगी नावे करून घेतल्याचा, आणि त्यातून तब्बल 1000 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांच्यावर केला होता. या संदर्भातील कागदपत्रे त्यांनी वकील असीम सरोदे यांच्या मार्फत मुंबईतील ED कार्यालयातही सादर केली. परंतु, आरोपानुसार “सुरेश धस भाजपचे आमदार असल्यामुळे” कारवाई न झाल्याचेही असीम सरोदे यांनी सांगितले. यानंतर पोलिसांत तक्रारी देऊनही दखल न घेतल्यामुळे हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिल्यानंतरच सुरेश धस आणि इतरांविरोधात गुन्हा नोंद झाला. मात्र, अटक न झाल्याने राम खाडे सातत्याने पाठपुरावा करत होते.
हेही वाचा – Nashik Tapovan Controversy: तपोवन प्रकरणावरून राज ठाकरे मैदानात; सरकारला दिला थेट इशारा
हल्ले आणि धमक्या; सरोदे यांचा खळबळजनक खुलासा
वकील सरोदे यांनी सांगितले की, त्यांनी अनेक वेळा राम खाडे यांना जीवाला धोका असल्याची सूचना दिली होती. आधीही राम खाडे यांच्या शेतातील शेडवर हल्ला झाला होता, त्यांच्या पत्नी आणि नातेवाईकांनाही मारहाण करण्यात आली होती. शेवटी राम खाडे यांनी काही काळ पोलीस संरक्षण मिळवले होते, परंतु ते संरक्षण नंतर अचानक काढून घेण्यात आले.
हेही वाचा – Shirdi Eknath Shinde : …आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विमानतळावरच धावू लागले, 'तो' व्हिडीओ व्हायरल
राम खाडेंवर 17 वार, प्रकृती अतिशय गंभीर
दरम्यान, राम खाडे यांच्यावर झालेल्या हल्ल्यात राम खाडे यांच्यावर सुमारे 17 वार करण्यात आले. त्यांना तात्काळ पुण्यात दाखल करण्यात आले असून प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यानंतर खाडे यांच्या समर्थकांनी सुरेश धस यांच्या गटावर थेट गंभीर आरोप केले आहेत. अत्यंत मोठ्या आर्थिक गैरव्यवहार, राजकीय दबाव, भ्रष्टाचार आणि आता प्राणघातक हल्ला या सर्व घटनांमुळे प्रकरणाची चौकशी कोणत्या दिशेने जाईल याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.