Raju Shetty : ‘आधी स्वतःचे मानधन गोठवा, मग जनतेला काटकसरीचे सल्ले द्या;’ राजू शेट्टींचा पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा

पंतप्रधानांकडून वित्तीय संस्थांना मिळालेले खर्च कपातीचे आदेश आणि इंधन बचतीच्या आवाहनाचा संदर्भ देत राजू शेट्टी यांनी राज्यकर्त्यांच्या दुटप्पी भूमिकेवर निशाणा साधला.

Raju Shetty : ‘आधी स्वतःचे मानधन गोठवा, मग जनतेला काटकसरीचे सल्ले द्या;’ राजू शेट्टींचा पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Raju Shetti criticizes PM Modi and CM Fadnavis : देशात वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता होरपळत असताना राज्यकर्त्यांकडून दिल्या जाणाऱ्या काटकसरीच्या सल्ल्यांवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. कोल्हापूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी थेट पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर खोचक शब्दांत ताशेरे ओढले. देशाची आर्थिक परिस्थिती जर खरंच खालावली असेल किंवा काळजीची असेल, तर सरकारने जनतेला उपदेश देण्यापूर्वी स्वतःपासून सुरुवात करावी, असे आव्हान त्यांनी दिले आहे.

काटकसरीच्या आवाहनावरून सरकारला टोला
पंतप्रधानांकडून वित्तीय संस्थांना मिळालेले खर्च कपातीचे आदेश आणि इंधन बचतीच्या आवाहनाचा संदर्भ देत राजू शेट्टी यांनी राज्यकर्त्यांच्या दुटप्पी भूमिकेवर निशाणा साधला.
‘देशाची परिस्थिती जर बिकट असेल, तर सर्वात आधी पंतप्रधान, सर्व केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतःचे मानधन गोठवून आदर्श घालून द्यावा, त्यानंतरच इतरांना काटकसर करण्याचे सल्ले द्यावेत. केवळ जनतेला आणि सरकारी कर्मचाऱ्यांना निर्बंध लावून देशाची आर्थिक स्थिती सुधारणार नाही, तर सर्वात मोठी काटकसर ही नेत्यांच्या शासकीय खर्चात होणे गरजेचे आहे,’ असे राजू शेट्टी म्हणाले.

हेही वाचा – Gateway of India Electric Boats: मुंबईत जलपर्यटनाची नवी क्रांती! गेटवे ऑफ इंडियावरील डिझेल बोटी होणार इलेक्ट्रिक; कोणाला होणार फायदा?

‘बुलेट’वरून विधानभवनात जाण्याच्या स्टंटबाजीची पोलखोल
काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी बुलेटवरून विधानभवनात गेले होते, या घटनेचा राजू शेट्टी यांनी चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की, फक्त एक दिवस बुलेटवरून जाऊन किंवा इंधनाची बचत करण्याचे नाटक करून प्रश्न सुटणार नाहीत. मुख्यमंत्री ज्या दिवशी दुचाकीवरून गेले, त्या दिवशीही त्यांच्या सुरक्षिततेसाठी पाठीमागे गाड्यांचा भलामोठा ताफा तैनात होताच. फक्त ते स्वतः त्या ताफ्यातील गाडीत बसले नव्हते. हा निव्वळ प्रसिद्धीचा स्टंट असल्याची टीका त्यांनी केली.

सरकारी कार्यक्रमांमधील उधळपट्टीवर जाहीर आक्षेप
आपल्या टीकेचा रोख पुढे नेत त्यांनी सातारा येथे झालेल्या एका शासकीय कार्यक्रमाचे उदाहरण दिले. साताऱ्यातील मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी तब्बल 300 पेक्षा जास्त एसटी बसेस भरून माणसे आणली गेली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले. या बसेस काय पाण्यावर चालतात का, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. जनतेला पेट्रोल-डिझेल जपून वापरण्याचा सल्ला द्यायचा आणि स्वतःच्या राजकीय कार्यक्रमांसाठी मात्र शेकडो गाड्यांची उधळपट्टी करायची, ही शासनाची दुटप्पी नीती आता उघडी पडली असल्याचे राजू शेट्टी यांनी शेवटी स्पष्ट केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number