Ramdas Athawale on Uddhav Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात अलीकडच्या काळात वाढलेल्या भेटींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही ठाकरे एकत्र येणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अशा घडामोडींवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या महायुतीला लाभ
राज आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली, तर मुंबईतील मराठी मतदारांमध्ये फूट पडेल आणि त्याचा सर्वाधिक लाभ महायुतीला होईल, असा दावा आठवले यांनी केला. राज ठाकरेंना सोबत घेण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंसाठी फायदेशीर ठरणार नसून, तो उलट अडचणी वाढवणारा ठरेल, असा इशाराही त्यांनी दिला. राज ठाकरेंची साथ ही उद्धव ठाकरेंच्या राजकीय वाटचालीसाठी मारक ठरेल, असे मतही आठवले यांनी व्यक्त केले. भूतकाळातील अनुभवांचा दाखला देताना आठवले म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे महायुतीसोबत असतानाही अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र विधानसभेच्या निवडणुकीत राज ठाकरे सोबत नसतानाही महायुतीला चांगले यश मिळाले. त्यामुळे राज ठाकरे यांच्याशी युती केली म्हणजेच निवडणुकीत फायदा होईल, असे समीकरण ठरवता येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – Devendra Fadnvis: "…तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही" हिवाळी अधिवेशनाच्या समारोप गदारोळात फडणवीस संतापले
दरम्यान, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीबाबत बोलताना आठवले यांनी महायुतीचा आत्मविश्वास व्यक्त केला. सध्या उद्धव ठाकरे यांच्या ताब्यात असलेली मुंबई महापालिका पुन्हा मिळवण्यासाठी महायुती पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी निवडणुकीनंतर मुंबईचा महापौर महायुतीचाच असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच महापालिकेतील एकूण 25 जागांपैकी किमान 16 जागांवर आरपीआयचा दावा असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील असे केलेले विधान कोणत्या माहितीच्या आधारावर आहे, असा प्रश्न आठवले यांनी उपस्थित केला. भाजप सहजपणे मुख्यमंत्रीपद सोडेल, असे वाटत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
तथापी, मतदार याद्यांच्या मुद्द्यावर बोलताना आठवले यांनी राहुल गांधींवर टीका केली. मतदार यादी अचूक असावी, त्यात त्रुटी नसाव्यात, हे मान्य आहे. मात्र राहुल गांधी वारंवार मतचोरीचे आरोप करत आहेत. मग लोकसभा निवडणुकीतही अशीच परिस्थिती होती का, असा सवाल त्यांनी केला. भाजपवर लहान पक्ष संपवले जात असल्याच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना आठवले म्हणाले की, भाजप छोटे पक्ष संपवत आहे, हा आरोप चुकीचा आहे. मी स्वतः माझा पक्ष वाढवत आहे. आम्ही सध्या सत्तेत नसलो, तरी महायुतीचा घटक आहोत, असे त्यांनी सांगितले. आरपीआयला आणखी दोन राज्यांत मान्यता मिळाल्यास पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.