Harshwardhan Sapkal On Rahul Narwekar: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची लोकशाही गुंडाळून ठेवण्याचा घाट घातला आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महायुती सरकारच्या कार्यपद्धतीवर ‘बेशरमपणा’ आणि ‘गुंडागर्दी’ अशा जहाल शब्दांत टीका केली आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सपकाळ यांनी अत्यंत बोचरी टीका केली आहे. नार्वेकर हे महाराष्ट्राच्या इतिहासातील ‘काळे पान’ आहेत. त्यांनी संविधानाच्या 10 व्या अनुसूचीचा खून केला असून, संविधानाच्या छातीत सुरा खुपण्याचे काम केले आहे, असे ते म्हणाले. त्यांच्या याच ‘करंट्या’ कामाचे बक्षीस म्हणून भाजपने त्यांना पुन्हा अध्यक्षपद दिले, असा आरोप करत त्यांनी नार्वेकरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
निवडणूक आयोगाला ‘लाज’ वाटली पाहिजे
निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सर्व काही उघड असतानाही आयोग पुरावे मागत आहे. आयोगाने स्वतःची स्वायत्तता गमावली असून ते सत्तेचे मूक साक्षीदार बनले आहेत, अशा शब्दांत त्यांनी आयोगाची कानउघडणी केली.
निवडणुकीतील ‘घोडेबाजार’
सपकाळ यांनी सत्ताधाऱ्यांच्या निवडणूक नीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना म्हटले की, नगरपालिकेप्रमाणेच आता मनपा निवडणुकीतही पैशांचा वणवा पेटवण्यात आला आहे. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी सत्तेसाठी सर्व नीतिमत्ता बाजूला सारली आहे. बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपय्या हा नवा खेळ सत्ताधारी खेळत असून, लोकशाहीचा सण असलेल्या निवडणुकीला त्यांनी भ्रष्ट केले आहे. सहसा घोडेबाजार निवडणुकीनंतर होतो, पण महायुतीने निवडणुकीपूर्वीच उमेदवारांची खरेदी-विक्री सुरू करून नवा विक्रम प्रस्थापित केल्याचा टोला त्यांनी लगावला.
राज्यात मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या बिनविरोध निवडींवर सपकाळ यांनी संशय व्यक्त केला आहे. या निवडी उमेदवारांच्या लोकप्रियतेमुळे नाही, तर पैशांच्या जोरावर झाल्या आहेत, असे ते म्हणाले. या प्रक्रियेचा निषेध म्हणून ज्या ठिकाणी बिनविरोध निवड झाली आहे, तिथे NOTA चा पर्याय असलेली ईव्हीएम यंत्रे ठेवून मतदारांना आपला संताप व्यक्त करण्याची संधी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.