Rahul Gandhi: दिल्लीतील जंतर-मंतरवर नीट (NEET) प्रश्नपत्रिका फुटीच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र झाले आहे. याच आंदोलनाला पाठिंबा दर्शवत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उपोषणकर्त्या डाव्या विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींसह आणि सोनम वांगचुक यांच्या उपस्थितीत माध्यमांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांची बाजू मांडत केंद्र सरकारसमोर तीन थेट मागण्या ठेवून जोरदार हल्लाबोल केला.
शिक्षणमंत्र्यांच्या हकालपट्टीची मागणी
गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा तातडीने राजीनामा द्यावा, अशी ठाम भूमिका राहुल गांधी यांनी घेतली. केवळ खातेबदल करून सरकारला आपली जबाबदारी टाळता येणार नाही, तर धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून पूर्णपणे हटवणेच योग्य ठरेल, असे ते म्हणाले.
दोषी पोलिसांवर कठोर कारवाईचा इशारा
शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीमार करणाऱ्या पोलिसांवर राहुल गांधी यांनी तीव्र संताप व्यक्त केला. विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर आणि लाठीचार्जचे आदेश देणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधानांनी देशवासीयांची माफी मागावी
पेपर लीकसारख्या गंभीर मुद्द्यामुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात सापडले आहे. या संपूर्ण अनागोंदीची आणि पोलिसांच्या अत्याचाराची जबाबदारी स्वीकारून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांची व देशाची जाहीर माफी मागितली पाहिजे, अशी अंतिम मागणी राहुल गांधी यांनी सरकारसमोर मांडली.