Rahul Gandhi: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या घडामोडीवर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘X’ (ट्विटर) वर व्हिडिओ शेअर करत आपली पहिली प्रतिक्रिया नोंदवली. शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा हे देशातील ढासळलेली शिक्षण व्यवस्था पूर्वपदावर आणण्याच्या दिशेने पडलेले अत्यंत महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगत राहुल गांधी यांनी देशभरातील विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांचे धैर्य अन् लोकशाहीचा विजय
आपल्या भविष्यासाठी, संविधानासाठी आणि हक्कांच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरून लढा देणाऱ्या प्रत्येक तरुणाचे राहुल गांधींनी कौतुक केले. “स्वतःच्या स्वाभिमानासाठी आणि घटनात्मक मार्गाने अन्यायाविरोधात ठामपणे उभे राहणे हेच खरे धैर्य आहे. विद्यार्थ्यांच्या या लढाऊ वृत्तीचा मला अत्यंत अभिमान वाटतो,” असे ते म्हणाले. शेतकरी, मजूर आणि शोषित घटकांनीही याच धैर्याने सरकारच्या अन्यायाविरोधात आवाज उठवला पाहिजे, असा संदेश त्यांनी दिला.
2 मागण्या अजूनही प्रलंबित; पंतप्रधानांच्या माफीवर काँग्रेस ठाम
शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा झाला असला तरी आंदोलनाच्या इतर २ प्रमुख मागण्या अद्याप बाकी असल्याचे राहुल गांधींनी स्पष्ट केले. देशातील तरुणांचे भविष्य धोक्यात आणल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे आणि आंदोलक विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई झालीच पाहिजे, या भूमिकेवर काँग्रेस ठाम आहे. जंतर-मंतरवरील आंदोलनाला पाठिंबा दर्शवत राहुल गांधींनी यापूर्वी पंतप्रधानांच्या निवासासमोर धरणे आंदोलनही केले होते.
माध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. “धर्मेंद्र प्रधान हे शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराचे केंद्रबिंदू बनले होते, त्यामुळे त्यांना पद सोडावेच लागले,” असा आरोप त्यांनी केला. गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) शिक्षण व्यवस्थेत हस्तक्षेप करून ती पोकळ केली आहे, असा घणाघात करत त्यांनी विद्यार्थ्यांवरील पोलिसांच्या लाठीमार प्रकरणाचा मुद्दा आगामी संसद अधिवेशनात लावून धरण्याचा इशारा दिला.
धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा हमारे education system को फिर से संवारने की दिशा में बहुत बड़ा कदम है। शाबाश देश भर के छात्रों, आप सभी पर गर्व है। सड़कों पर आ कर लोकतंत्र, संविधान और अपने भविष्य की रक्षा में डट कर खड़े होने वाले हर एक युवा, हर छात्र को बहुत-बहुत बधाई। 2 मांगें… pic.twitter.com/Uc2cEOCVKA — Rahul Gandhi (@RahulGandhi) July 25, 2026
धर्मेंद्र प्रधान यांनी पंतप्रधान मोदींकडे सोपवला राजीनामा
जंतर-मंतरसह देशभरात पसरलेल्या तीव्र असंतोषानंतर अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा त्याग केला. सोशल मीडियावरून राजीनाम्याची माहिती देताना त्यांनी गेल्या 10 दिवसांत घडलेल्या दुर्दैवी घटनांबद्दल खेद व्यक्त केला असून, आपले दोन पानी राजीनामा पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केले आहे.
तरुणांच्या आकांक्षांचा मला आदर – राजीनामा पत्रातील भावूक सूर
आपल्या राजीनामा पत्रात धर्मेंद्र प्रधान यांनी गेल्या 4 दशकांपासून विद्यार्थी व शिक्षण क्षेत्रासाठी केलेल्या कार्याचा उल्लेख केला. हा निर्णय माझ्या वैयक्तिक प्रतिष्ठेचा नसून देशाच्या युवा पिढीच्या भावनांचा सन्मान करणारा आहे, असे त्यांनी म्हटले. “भारतातील तरुणांची स्वप्ने पूर्ण करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे,” असे सांगत त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशसेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.