Putin Food Security: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन परदेशात जेव्हा जेव्हा अधिकृत दौऱ्यावर जातात, तेव्हा त्यांच्या सुरक्षेइतकाच कडक प्रोटोकॉल त्यांच्या जेवणाबाबतही पाळला जातो. पुतिन यांच्या अन्नाबाबतची खबरदारी पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल, कारण त्यांच्यासोबत नेहमीच एक संपूर्ण 'फूड काफिला' प्रवास करतो.
दिल्ली आगमनापूर्वी ‘रशियन फूड काफिला’ सज्ज
फर्स्टपोस्टच्या वृत्तानुसार, पुतिन यांचे IL-96 विमान आज दिल्लीमध्ये उतरणार आहे. त्या विमानात रशियन त्सोरोग, रशियन आईस्क्रीम, रशियन मध, तसेच रशियन बाटलीबंद पाणी यांसारखी खाद्यपदार्थांची खास खेप एका वेगळ्या डब्यात पॅक करून आणली जाईल. हे पाहून हा छंद आहे का सुरक्षा धोरण? असा प्रश्न अनेकांना पडतो.
हेही वाचा – India- Russia Relations: पुतिन यांच्या आगमनापूर्वी रशियाची राजनैतिक चाल, भारताचा निर्णय ठरेल निर्णायक
भारतीय शेफने बनवलेले अन्न पुतिन का खात नाहीत?
भारतीय शेफने बनवलेले अन्न न खाण्यामागचं कारण म्हणाजे सुरक्षा. 2014 मध्ये पुतिन भारतात आले होते, तेव्हा मुंबईतील ताज हॉटेलचा संपूर्ण मजला रशियन एफएसओने ताब्यात घेतला होता. हॉटेलच्या स्वयंपाकघरातून सर्व भारतीय मसाले हटविण्यात आले. कारण पुतिन फक्त त्यांच्या टीमने तयार केलेलेच अन्न खातात. 2018 मध्ये गोव्यातील भारत-रशिया शिखर परिषदेदरम्यान, हैदराबाद हाऊसमध्ये एका रशियन शेफने स्वतःचा वेगळं किचन केलं होतं. राष्ट्रपती भवनात बिर्याणी आणि कबाबची तयारी झाली, पण पुतिन यांनी त्याला हात लावला नाही. त्यांनी फक्त रशियन सॅलड आणि ट्वोरोग खाल्ले.
हेही वाचा – Imran Khan: 'मला भाजपाशी मैत्री करायची होती, पण…'; इमरान खान यांनी त्यांच्या बहिणीला नेमकं काय सांगितलं?
‘पोर्टेबल फूड लॅब’
माजी एफएसओ अधिकारी आणि पत्रकार आंद्रेई सोल्डाटोव्ह यांनी द न्यू नोबिलिटी या पुस्तकात लिहिले आहे की, 2001 पासून पुतिन यांच्या सर्व दौऱ्यांवर ‘पोर्टेबल फूड लॅबोरेटरी’ जाते. यात असलेले स्पेक्ट्रोमीटर आणि रासायनिक चाचण्या प्रत्येक डिशची तपासणी करतात. 2017 मध्ये फ्रान्सच्या व्हर्साय पॅलेसमध्येही हेच घडले. फ्रेंच शेफचे वैभवशाली क्रोइसेंट आणि फोई ग्रास तयार होते, पण पुतिन यांनी फक्त त्यांचे खास सूप आणि ट्वोरोग खाल्ले. रशिया टुडेच्या माहितीनुसार, पुतिन यांचे दूध, मध, चीज, फळे, भाज्या यांसह सर्व खाद्यपदार्थ मॉस्कोबाहेरील खास फार्ममधून येतात. त्या फार्मवरील पशुधनावर 24 तास लक्ष ठेवले जाते. त्यामुळे भारतीय पदार्थ फक्त पुतिन यांच्या टेबलावर दिसतील. पण पुतिन यांच्यात ताटात मात्र, फक्त रशियन अन्नचं वाढलं जाईल.