Pune Water Crisis: पुणेकरांवर पाणीबाणीचे सावट! धरणांतील साठा 20 टक्क्यांच्या खाली; पालिका घेणार ‘हा’ मोठा निर्णय

पुणे महानगरपालिका संपूर्ण शहरात 'एक दिवसाआड पाणीपुरवठा' लागू करण्याच्या तयारीत असून, त्याबाबतचा प्रस्तावही प्रशासनाच्या विचाराधीन आहे.<br/>

Pune Water Crisis: पुणेकरांवर पाणीबाणीचे सावट! धरणांतील साठा 20 टक्क्यांच्या खाली; पालिका घेणार ‘हा’ मोठा निर्णय

Pune Water Crisis: कडक उन्हाळ्याच्या झळा सोसल्यानंतर आता पुणेकरांसमोर पाणीटंचाईचे गंभीर संकट उभे ठाकले आहे. मान्सूनच्या आगमनाला होत असलेला विलंब, पावसावर 'एल निनो'चा कायम असलेला प्रभाव आणि धरणांमधील वेगाने घटणारा जलसाठा यामुळे शहरात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका संपूर्ण शहरात 'एक दिवसाआड पाणीपुरवठा' लागू करण्याच्या तयारीत असून, त्याबाबतचा प्रस्तावही प्रशासनाच्या विचाराधीन आहे.

धरणांमध्ये केवळ 5.5 TMC पाणीसाठा

खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांतील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. सध्या या चारही धरणांमध्ये मिळून अवघा 5.5 TMC इतकाच पाणीसाठा उपलब्ध असून, तो एकूण क्षमतेच्या 20 टक्क्यांपेक्षाही कमी आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) यंदा सरासरीच्या केवळ 90 टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे उपलब्ध जलसाठा 31 ऑगस्टपर्यंत पुरवण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे. याच पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांना 15 टक्के पाणीकपात करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

आयुक्तांकडे प्रस्ताव; नियोजनाला वेग

पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्याकडे मंजुरीसाठी सादर केला आहे. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी सर्वपक्षीय नेते आणि लोकप्रतिनिधींशी चर्चा करण्यात येणार आहे. मात्र, संभाव्य पाणीकपातीच्या दृष्टीने महापालिकेने आतापासूनच तयारी सुरू केली आहे.

मायक्रो-प्लॅनिंग आणि नव्या वेळापत्रकाची तयारी

संभाव्य पाणीपुरवठा कपातीसाठी सर्व अधीक्षक आणि कार्यकारी अभियंत्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील पाणी वितरणाचा सूक्ष्म आराखडा तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, एक दिवसाआड पाणीपुरवठा लागू झाल्यास कोणत्या भागाला कोणत्या दिवशी, किती वेळ आणि कोणत्या वेळेत पाणी दिले जाईल याचे सविस्तर वेळापत्रक तयार करून मुख्य कार्यालयात सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा – Onion Farmers : कांदा उत्पादकांना मोठा दिलासा! थेट बाजार समित्यांमधून होणार कांदा खरेदी

पाणी जपून वापरण्याचे आवाहन

मान्सून आणखी लांबल्यास किंवा अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्यास पुणे शहराला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी आतापासूनच पाण्याचा वापर जपून आणि काटकसरीने करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. आगामी काही आठवडे पुण्याच्या पाणीस्थितीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number