Hamza Burhan Death: जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी नेटवर्कला पुन्हा एकदा मोठा हादरा बसला आहे. बंदी घातलेल्या 'अल-बद्र' या दहशतवादी संघटनेचा मुख्य म्होरक्या आणि खतरनाक कमांडर अर्जमंद गुलजार ऊर्फ 'बुरहान हमजा' याचा पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) गेम ओव्हर झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अज्ञात बंदुकधाऱ्यांनी त्याच्यावर अंधाधुंद गोळ्या झाडून त्याचा खात्मा केला. दक्षिण काश्मीरमधील स्थानिक तरुणांची माथी भडकवून त्यांना दहशतवादाच्या खाईत लोटणारा हा मुख्य सूत्रधार असल्याचे भारतीय सुरक्षा यंत्रणांचे म्हणणे आहे.
वैध पासपोर्टवर पाकिस्तानात गेला आणि बनला कमांडर
मूळचा दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील रत्नीपोरा येथील रहिवासी असलेला अर्जमंद गुलजार सुमारे 7 वर्षांपूर्वी एका कायदेशीर प्रवासाच्या बहाण्याने थेट पाकिस्तानात पोहोचला होता. तिथे गेल्यावर त्याने 'अल-बद्र' या दहशतवादी संघटनेचे सदस्यत्व घेतले आणि आपल्या क्रूर कारवायांमुळे तो अल्पावधीतच संघटनेचा 'ऑपरेशनल कमांडर' बनला. पाकिस्तानात सुरक्षित आश्रय घेऊन तो तिथूनच काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांची नवी भरती करणे, शस्त्रास्त्रांची तस्करी आणि दहशतवादी कारवायांसाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक रसद पुरवण्याचे काम पाहत होता.
भारत सरकारने 2022 मध्ये घोषित केले होते 'दहशतवादी'
बुरहान हमजा हा बऱ्याच काळापासून भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या 'मोस्ट वॉन्टेड' यादीत अव्वल स्थानी होता. त्याच्या देशविरोधी कारवायांची गंभीर दखल घेत, 2022 मध्ये भारत सरकारच्या केंद्रीय गृह मंत्रालयाने (MHA) त्याला अधिकृतपणे 'दहशतवादी' म्हणून घोषित केले होते. पुलवामा आणि संपूर्ण दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांचे षड्यंत्र रचणे, तरुणांना कट्टरपंथी बनवणे आणि दहशतवादासाठी फंडिंग गोळा करणे यामध्ये त्याचा थेट सहभाग असल्याचे गृह मंत्रालयाने स्पष्ट केले होते.
डिजिटल कट्टरपंथीकरणाच्या जोरावर पुलवामात पसरवले जाळे
काश्मीर खोऱ्यातील पुलवामा आणि अवंतीपोरा हा परिसर दहशतवादाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानला जातो. याच भागातून आलेल्या कुख्यात बुरहान वानीप्रमाणेच अर्जमंद गुलजारने देखील तरुणांना आकर्षित करण्यासाठी 'डिजिटल रॅडिकलायझेशन' (Social Media) मॉडेलचा प्रभावी वापर केला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून स्थानिक निष्पाप तरुणांची माथी भडकवून त्यांना हातात शस्त्रे घेण्यास प्रवृत्त करण्यात त्याचा मोठा हात होता.
OGWs च्या मदतीने चालवायचा मोठा सिंडिकेट
सुरक्षा दलांनी दिलेल्या माहितीनुसार, बुरहान हमजाचे दहशतवादी जाळे प्रामुख्याने पुलवामा, शोपियां आणि अवंतीपोरा परिसरात पसरले होते. तो पाकिस्तानात बसून काश्मीरमधील 'ओव्हरग्राउंड वर्कर्स' (OGWs) च्या संपर्कात असायचा. त्यांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर ग्रेनेड हल्ले घडवून आणणे, स्फोटकांचा साठा पुरवणे आणि भारतीय लष्कराच्या हालचालींवर लक्ष ठेवणे यांसारखी कामे तो करून घेत होता. त्याच्या या जाळ्यासह आता त्याचाही अंत झाल्यामुळे सीमेपलीकडील दहशतवादी यंत्रणेला मोठी खीळ बसली आहे.