Puducherry Election Results 2026 : दक्षिण भारताच्या राजकारणात भाजपचा भक्कम स्तंभ मानले जाणारे एन. रंगासामी यांनी पुदुच्चेरीत पुन्हा एकदा विजयाचा झेंडा फडकवला आहे. 30 जागांच्या या विधानसभेत एन. रंगासामी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए (NDA) आघाडीने बहुमताचा आकडा पार करत सत्ता राखली आहे. रंगासामी यांनी स्वतःच्या थट्टानचवडी मतदारसंघातून 4336 पेक्षा जास्त मतांच्या फरकाने आघाडी घेत विजयासह आपली लोकप्रियता पुन्हा सिद्ध केली आहे. निवडणूक आयोगाच्या ताज्या कलानुसार, रंगासामींचा एआईएनआरसी पक्ष (AINRC) 11 जागांवर आणि भाजप 4 जागांवर आघाडीवर असून एनडीए 17 जागांवर विजयाकडे वाटचाल करत आहे. एनडीएमधील LJK आणि AIADMK प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहेत.
काँग्रेस-द्रमुक आघाडीची पीछेहाट
या निवडणुकीत एनडीएला कडवे आव्हान देण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेस आणि द्रमुक (DMK) युतीला मोठा फटका बसला आहे. आताचे कल पाहता काँग्रेस 4 जागांवर आहे. तर द्रमुकला अवघ्या 4 जागांवर समाधान मानावे लागत आहे. म्हणजेच, सर्व मिळून केवळ 8 जागांवर आघाडीवर असलेल्या इंडिया (INDIA) आघाडीच्या या दारुण पराभवाच्या स्थितीमुळे दक्षिणेतील त्यांच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. एक्झिट पोलने आधीच एनडीएला 16 ते 20 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता, जो आता वास्तवात येताना दिसत आहे. सध्या इतरमधील आघाडीवर असेलल्या उमेदवारांची संख्या 5 वर पोहोचली असून यातील 3 अपक्ष आहेत. तर, NMK आणि TVK प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहेत.
हेही वाचा – Thalapathy Vijay : तामिळनाडूत विजय थलपती यांचा राजकारणातला डेब्यू 'सुपरहिट'; या 7 घोषणा ठरल्या गेमचेंजर
'थलपती' विजयची जादू ओसरली
तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अभिनेता विजय याच्या 'तमिळगा वेत्री कझगम' (TVK) पक्षाने पुदुच्चेरीत मोठी आशा लावून धरली होती. विजय यांनी 'नाम तमिळर काची' सोबत युती करून नशीब आजमावले; मात्र, रंगासामी यांच्या अनुभवापुढे त्यांचा प्रभाव फिका पडला. अनेक जागांवर विजय यांचा पक्ष खाते उघडण्यासाठीही संघर्ष करताना दिसत आहे. मतदारांनी कोणत्याही नवीन प्रयोगापेक्षा रंगासामींसारख्या अनुभवी आणि 'मक्कल मुतल्वर' (जनतेचा मुख्यमंत्री) प्रतिमेच्या नेत्यावरच पुन्हा विश्वास दर्शवला आहे.
पंतप्रधान मोदींचे निकटवर्तीय आणि भाजपचा विस्तार
एन. रंगासामी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अत्यंत जवळचे मानले जाते. पुदुच्चेरीमध्ये भाजपला पाय रोवण्यासाठी लागणारी जमिनीची रंगासामी यांनीच उपलब्ध करून दिली. या निवडणुकीत एआईएनआरसीने 16 आणि भाजपने 10 जागांवर निवडणूक लढवत प्रभावी समन्वय साधला होता. केंद्र सरकारच्या योजना आणि रंगासामी यांचे स्थानिक नेतृत्व यामुळे पुदुच्चेरीच्या विकासाला गती मिळाली आहे. रंगासामी यांनी आगामी 5 वर्षात पुदुच्चेरीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळवून देण्याचे आणि तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले आहे.