Prashant Jagtap : पुण्याचे माजी महापौर आणि आक्रमक नेते प्रशांत जगताप यांनी अखेर आपल्या राजकीय भवितव्याचा फैसला केला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तर्कवितर्कांना पूर्णविराम देत जगताप यांनी आज मुंबईतील टिळक भवनात अधिकृतपणे काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांनी घेतलेला हा निर्णय पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
टिळक भवनात पार पडला सोहळा
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार आणि पक्षाचे इतर वरिष्ठ नेते यांच्या उपस्थितीत प्रशांत जगताप यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला. यावेळी काँग्रेसच्या विचारधारेशी एकरूप होऊन काम करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
का सोडली पवारांची साथ?
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाशी हातमिळवणी करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. या युतीला जगताप यांचा तीव्र विरोध होता. भाजपशी हातमिळवणी करणाऱ्या कोणत्याही शक्तीसोबत मी काम करू शकत नाही, अशी रोखठोक भूमिका घेत त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. संविधानाचे रक्षण आणि पुरोगामी विचारांशी तडजोड न करणाऱ्या पक्षाची त्यांना साथ हवी होती, जी त्यांना काँग्रेसमध्ये दिसली.
हेही वाचा – BMC Election : 'अभिषेक घोसाळकरांचा मरणोत्तर..' तेजस्वी घोसाळकरांच्या पोस्टरमुळे दहिसरमध्ये वातावरण तापलं
उद्धव ठाकरेंनी दिली होती ऑफर
प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर त्यांना शिवसेना (UBT) कडूनही निमंत्रण आले होते. खुद्द उद्धव ठाकरे यांनी त्यांना फोन करून पक्षात येण्याची ऑफर दिली होती. याबाबत बोलताना जगताप म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्यासारखा मोठा नेता माझ्यासारख्या कार्यकर्त्याशी बोलला, ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. त्यांनी दिलेला मान मी विसरणार नाही, मात्र विचारधारेचा विचार करून मी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा – Pune BJP: पुणे भाजपची पहिली यादी तयार! 100 हून अधिक नावांवर शिक्कामोर्तब; आज होणार अधिकृत घोषणा
पुण्याच्या राजकारणावर काय परिणाम होणार?
दरम्यान, पुणे शहरात प्रशांत जगताप यांचा मोठा जनसंपर्क आहे. त्यांच्या प्रवेशामुळे पुण्यातील काँग्रेसला नवा चेहरा आणि ताकद मिळाली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेस आता अधिक आक्रमकपणे उतरण्याची शक्यता आहे. पुण्यातील एक विश्वासू आणि लढाऊ शहराध्यक्ष गमावणे हा शरद पवार यांच्या गटासाठी मोठा फटका मानला जात आहे.