Prajakt Tanpure: अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाबाबत गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू असतानाच आता या राजकीय घडामोडींना अनपेक्षित वळण मिळाले आहे. भाजपमध्ये प्रवेश निश्चित मानला जात असताना तनपुरे अचानक खासदार सुप्रिया सुळे यांच्या भेटीसाठी रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतून प्राजक्त तनपुरे यांनी माघार घेतल्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना अधिक बळ मिळाले होते. ही माघार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार घेतल्याचे बोलले जात होते. त्यानंतर त्यांना भाजपकडून विधान परिषदेसाठी संधी मिळू शकते, अशा चर्चा राजकीय स्तरावर रंगल्या होत्या. काही वृत्तांमध्ये तर 30 मे रोजी त्यांच्या भाजप प्रवेशाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, पक्षांतराच्या चर्चांमध्ये वेग आला असतानाच तनपुरे यांनी सुप्रिया सुळे यांची भेट घेण्याचा निर्णय घेतल्याने अनेक तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे. भाजपमध्ये जाण्याचा निर्णय बदलला का, की अंतिम चर्चांसाठी ही भेट होत आहे, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.
राजकीय भूमिकेबाबत संभ्रम
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपकडून तनपुरेंना विधान परिषदेवर संधी देण्याबाबत सकारात्मक हालचाली सुरू होत्या. त्यामुळे त्यांचा प्रवेश जवळपास निश्चित मानला जात होता. अशा वेळी अचानक झालेल्या या भेटीमुळे त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
दरम्यान, प्राजक्त तनपुरे यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवत राहुरी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांनी नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण तसेच आपत्ती व्यवस्थापन यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांमध्ये राज्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. मात्र 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या तनपुरे कुटुंबातील प्राजक्त तनपुरे हे माजी खासदार प्रसादराव तनपुरे यांचे पुत्र असून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे निकटवर्तीय नातेवाईक मानले जातात. त्यामुळे त्यांचा संभाव्य भाजप प्रवेश हा शरद पवार गटासाठी मोठा राजकीय धक्का ठरू शकतो, अशी चर्चा सध्या सुरू आहे.