PMC Election: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणातून भाजपच्या उमेदवार पूजा मोरे-जाधव यांनी अखेर माघार घेतली आहे. प्रभाग क्रमांक 2 मधून मिळालेली उमेदवारी पक्षांतर्गत आणि संघ समर्थकांच्या तीव्र विरोधामुळे त्यांना सोडावी लागली. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पूजा मोरे यांना भावना अनावर झाल्या. पती धनंजय जाधव यांच्या गळ्यात पडून त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
विरोध नेमका कशामुळे?
पूजा मोरे यांना भाजपने ‘एबी’ फॉर्म दिल्यानंतर सोशल मीडियावर जुन्या विधानांचा संदर्भ देत संघ आणि भाजप कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला होता. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर पूर्वी केलेल्या टीकेमुळे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. ‘पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या नाहीत,’ या त्यांच्या जुन्या विधानाचा दाखला देत त्या हिंदुत्ववादी नसल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला होता. वाढता विरोध पाहून पक्षाने त्यांना माघार घेण्याचे आदेश दिले.
अर्ज मागे घेतल्यावर पूजा मोरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी म्हटलं की, ‘मी अतिशय गरिबीतून आणि संघर्षातून इथवर आले आहे. शेतकऱ्यांसाठी अंगावर लाठ्या खाल्ल्या, पाच गुन्हे अंगावर घेतले. वकिलाला द्यायला पैसे नसतानाही मी काम केले. एका सामान्य कार्यकर्त्याला भाजपचे तिकीट मिळणे हे माझे भाग्य होते, पण माझ्याविरोधात रचलेल्या षडयंत्रामुळे आणि एका छोट्या चुकीचा बाऊ केल्यामुळे मला आज मागे हटावे लागत आहे.’
हेही वाचा – MNS vs Thackeray Sena : ठाकरे बंधूंच्या युतीत मिठाचा खडा; मुंबईतील ‘या’ वॉर्डात मनसे आणि ठाकरे गट आमनेसामने
हिंदुत्वासाठी त्याग करायला तयार –
पक्षाच्या विचारधारेबाबत भूमिका स्पष्ट करताना पूजा मोरे यांनी संघ परिवाराला भावनिक साद घातली. मी आता भाजपची विचारधारा पूर्णपणे समजून घेतली आहे. मला शहरात आल्यावर हिंदुत्ववादी चळवळ कळाली. तुम्हाला जेवढे हिंदुत्व प्रिय आहे, तेवढेच मलाही आहे. पक्षासाठी आणि हिंदुत्वासाठी मी या जागेचा त्याग करत आहे. संघ परिवार आणि हिंदुत्ववादी संघटनांनी मला स्वीकारावे, असं आवाहनही यावेळी पूजा मोरे यांनी केलं.