Rohit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते रोहित पवार यांनी राज्यातील बड्या नेत्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या हेलिकॉप्टरचे लँडिंग नियोजित ठिकाणी न होता पार्किंग लॉटमध्ये झाल्याच्या घटनेवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सरकारकडून एवढ्या मोठ्या नेत्याच्या बाबतीत असा दुर्लक्षपणा होणे योग्य नाही, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, अजित पवार यांच्या अपघाताबाबतही संशय व्यक्त करत, “अपघात होतात की घातपात?” असा प्रश्न विचारून त्यांनी या सर्व प्रकरणांच्या सखोल तपासाची मागणी केली आहे.
‘खरात’ प्रकरण आणि ‘ब्लॅक मॅजिक’चे धक्कादायक दावे
रोहित पवार यांनी नाशिकमधील गाजलेल्या ‘खरात’ प्रकरणावर भाष्य करताना खळबळजनक दावे केले आहेत. या प्रकरणातील ‘भोंदू बाबा’सोबत सत्तेतील काही बड्या नेत्यांचे कनेक्शन असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तिथे होणाऱ्या पूजेमध्ये बाहुलीचा वापर करणे, रक्त काढणे अशा प्रकारच्या ‘ब्लॅक मॅजिक’चे व्हिडिओ अद्याप बाहेर का आले नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. काही महिलांसोबतचे व्हिडिओ आणि ‘हनी ट्रॅप’च्या माध्यमातून नेत्यांना किंवा अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल केले जात आहे का, अशी शंकाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
राजकीय दबावासाठी व्हिडिओंचा वापर? भाजपकडे रोख
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी (SIT) स्थापन झाली असली, तरी काही बड्या नेत्यांची नावे आणि माहिती अद्याप गुलदस्त्यात का आहे, असा प्रश्न रोहित पवार यांनी विचारला. “या माहितीचा आणि व्हिडिओंचा उपयोग राजकीय दबाव आणण्यासाठी किंवा नेत्यांना आपल्या बाजूला खेचण्यासाठी भाजप करत आहे का?” असा थेट संशय त्यांनी व्यक्त केला. पुरोगामी महाराष्ट्रात जर काही नेते ब्लॅक मॅजिक करत असतील, तर त्यांचे चेहरे समोर येणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
खोट्या एन्काऊंटरची भीती आणि वारकरी संप्रदायावरील भाष्य
रोहित पवार यांनी ‘खरात’ प्रकरणातील मुख्य आरोपीच्या जीवाला धोका असल्याचेही म्हटले आहे. 27, 28 आणि 29 जानेवारी या तीन दिवसांत आरोपीच्या बँक खात्यात झालेली मोठी उलाढाल संशयास्पद असून, बरीच माहिती समोर येण्यापूर्वीच आरोपीचा खोटा एन्काऊंटर दाखवून विषय संपवला जाऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. तसेच, वारकरी संप्रदायावर प्रतिगामी विचारांचे आक्रमण होत असून, राजकीय फायद्यासाठी संतांच्या विचारांशी तडजोड केली जात असल्याबद्दल त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.