Eknath Shinde Secret Delhi Visit: राजकारणात खळबळ! कोणालाही न सांगता एकनाथ शिंदेंनी गाठली दिल्ली; अमित शाहांसोबत गुप्त बैठक

विधान परिषद निवडणुकीच्या जागावाटपावरून महायुतीत रस्सीखेच सुरू असतानाच, एकनाथ शिंदे यांनी कोणालाही काडीचाही सुगावा लागू न देता गुपचूप दिल्ली गाठून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.

Eknath Shinde Secret Delhi Visit: राजकारणात खळबळ! कोणालाही न सांगता एकनाथ शिंदेंनी गाठली दिल्ली; अमित शाहांसोबत गुप्त बैठक

Eknath Shinde Secret Delhi Visit: महाराष्ट्राच्या राजकारणातून एक अत्यंत खळबळजनक आणि तितकीच धक्कादायक माहिती समोर येत आहे. विधान परिषद निवडणुकीच्या जागावाटपावरून महायुतीत रस्सीखेच सुरू असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणालाही काडीचाही सुगावा लागू न देता गुपचूप दिल्ली गाठून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे. या 'सिक्रेट' भेटीमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले असून प्रचंड खळबळ उडाली आहे.

दोन दिवसांचा अपयशी दौरा अन् शनिवार रात्रीचा 'तो' तातडीचा फोन
या अत्यंत गुप्त मानल्या गेलेल्या भेटीची पार्श्वभूमी कमालीची नाट्यमय आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चार दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे हे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर गेले होते. अमित शाह यांची भेट घेण्यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न केले, मात्र व्यस्त वेळापत्रकामुळे शाह यांची वेळ मिळू शकली नव्हती आणि परिणामी शिंदेंना रिकाम्या हाताने महाराष्ट्रात परतावे लागले होते. मात्र, पहिल्या प्रयत्नात भेट न झाल्याने शिंदे सातत्याने संपर्कात होते. अखेर शनिवारी रात्री थेट अमित शाह यांच्या कार्यालयातून शिंदेंना दिल्लीत येण्याचा तातडीचा निरोप धाडण्यात आला.

पीए किंवा सहाय्यकाशिवाय अतिगुप्त नियोजन 
अमित शाहांचा निरोप मिळताच रविवारी एकनाथ शिंदे यांनी कोणत्याही लवाजम्याविना, अगदी आपले पीए किंवा सहाय्यकालाही सोबत न घेता एका खाजगी विमानाने थेट दिल्ली गाठली. दिल्लीत अमित शाह यांच्यासोबत अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक आटोपून एकनाथ शिंदे थेट बंगळुरूला रवाना झाले आणि तिथून ते गुपचूप ठाण्यातील आपल्या निवासस्थानी परतले. या संपूर्ण प्रवासादरम्यान गोपनीयता पाळण्यासाठी हा विशेष मार्ग निवडल्याची माहिती समोर आली आहे.

शिंदेंची अंतर्गत अस्वस्थता आणि 'ऑपरेशन टायगर'साठी ग्रीन सिग्नलची प्रतीक्षा?
अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली, याचा अधिकृत तपशील अजून गुलदस्त्यात आहे. मात्र, सूत्रांच्या मते महायुतीमधील अंतर्गत घडामोडींमुळे शिंदे गेल्या काही दिवसांपासून प्रचंड अस्वस्थ आहेत, तसेच महायुतीत आपल्या पक्षाची कोंडी होत असल्याची भावना त्यांच्या मनात आहे. या कोंडीतून बाहेर पडण्यासाठी आणि शिवसेनेचा विस्तार करण्यासाठी एकनाथ शिंदेंनी 'ऑपरेशन टायगर' ही महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. मात्र, या योजनेला गती देण्यासाठी दिल्लीतील भाजप हायकमांडकडून अद्याप 'ग्रीन सिग्नल' मिळालेला नाही. नेमक्या याच मुद्द्यावर आणि जागावाटपाच्या तिढ्यावर अमित शाहांसोबत निर्णायक चर्चा झाल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा – Pratap Sarnaik : "…तर दरवाढ करावी लागेल" डिझेल दरवाढीमुळे एसटीचा प्रवास महागणार? प्रताप सरनाईकांचे सूचक विधान

शिंदेंच्या खाजगी विमानात 'तो' शिक्षणसम्राट आणि माजी मंत्री कोण?  
या संपूर्ण गुप्त दौऱ्यात एका वेगळ्याच गोष्टीने राजकीय जाणकारांचे लक्ष वेधून घेतले आहे, ती म्हणजे एकनाथ शिंदेंच्या सोबतीला असलेला राज्यातील एक मोठा 'शिक्षणसम्राट' आणि शिवसेनेचा माजी मंत्री! विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वी या बड्या नेत्याचे आणि एकनाथ शिंदेंचे संबंध कमालीचे ताणले गेले होते आणि हा नेता शिंदेंवर प्रचंड नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, जुने सर्व मतभेद विसरून हा माजी मंत्री थेट शिंदेंच्या खाजगी विमानातून दिल्लीच्या सिक्रेट दौऱ्यावर सोबत गेल्याने, हा शिक्षणसम्राट नेमका कोण आणि या संपूर्ण नाट्यात त्याच्या उपस्थितीचे गूढ काय, यावर आता जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number