Pratibha Pawar meets Sonia Gandhi: सध्या देशभरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे राजकीय वातावरण प्रचंड तापलेले आहे. अशातच केंद्र सरकारवर सर्व बाजूंनी दबाव वाढत असताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अत्यंत वेगाने बदलणाऱ्या राजकीय चालींनी राजधानी दिल्लीत मोठे कुतूहल निर्माण केले आहे. जंतरमंतरवर आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतल्यानंतर अवघ्या 24 तासांच्या आत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर विरोधकांच्या गोटात विविध तर्कवितर्क लावले जात असतानाच, संध्याकाळी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेत राजकीय समीकरणांना नवे वळण दिले.
दरम्यान, पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या या उच्चस्तरीय बैठकीत खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या निदर्शनांबाबत आणि परीक्षांमधील गोंधळावर या भेटीत संवाद झाल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे या भेटीनंतर लगेचच सुप्रिया सुळे ‘इंडिया’ आघाडीच्या महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित राहिल्या आणि संध्याकाळी त्यांनी प्रतिभा पवार यांच्यासह सोनिया गांधी यांच्या 10 जनपथ या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. एकाच दिवसात सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही मुख्य केंद्रांशी पवार कुटुंबाने साधलेला हा संवाद सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.
हेही वाचा – Rahul Gandhi: ’10 वर्षांत 152 पेपर लीक…’; राहुल गांधी यांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल
सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर या भेटीची माहिती देताना प्रतिभा पवार आणि सोनिया गांधी यांचा एकत्र फोटो शेअर केला. “दोन अत्यंत कणखर, अनुभवी आणि दृढनिश्चयी महिला एकत्र आल्याचा हा क्षण प्रेरणादायी आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
Hon. Sonia Gandhi Ji and my mother. Two remarkable women – strong, compassionate, and truly dignified. Their resilience, wisdom, and steadfast spirit continue to inspire everyone who knows them. A moment worth preserving… clicked by me. ? pic.twitter.com/NgkGvvWy2l — Supriya Sule (@supriya_sule) July 22, 2026
पक्षाच्या चौकटीपलीकडे जाऊन सर्वपक्षीय संबंध आणि संवादाची परंपरा कायम ठेवण्याची पवार कुटुंबाची शैली या घडामोडींतून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. तथापि, विद्यार्थी आंदोलनाच्या नाजूक टप्प्यावर घडलेल्या या दोन भेटींमुळे आगामी राजकीय समीकरणांवर काय परिणाम होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.