PMC Election : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महाविकास आघाडीला मोठे तडे गेल्याचे चित्र समोर आले आहे. जागावाटपाच्या मुद्द्यावरून शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्यात निर्माण झालेला पेच आता टोकाला पोहोचला असून पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठकीला दांडी
महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असताना पुण्यात जागावाटपाचा तिढा सुटण्याऐवजी अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांची संयुक्त बैठक आज आयोजित करण्यात आली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या एकाही नेत्याने या बैठकीला हजेरी लावली नाही. राष्ट्रवादीच्या या भूमिकेमुळे संतप्त झालेल्या शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसने आता स्वतंत्रपणे पुढे जाण्याचा पवित्रा घेतला आहे.
संजय राऊतांचा 'गो अहेड'चा इशारा
बैठकीला राष्ट्रवादीचे नेते न आल्याने ठाकरे गट आणि काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी ही बाब आपल्या वरिष्ठांच्या कानावर घातली. सूत्रांच्या माहितीनुसार, खासदार संजय राऊत यांनी "आता कोणाचीही वाट पाहू नका, जागावाटप करून कामाला लागा," अशी स्पष्ट सूचना पुणे शहरातील नेत्यांना दिली आहे. यामुळे आता पुणे महानगरपालिकेत ठाकरे गट आणि काँग्रेस यांची नवी युती पाहायला मिळणार असून राष्ट्रवादीला वगळून निवडणुका लढवण्याची तयारी सुरू झाली आहे.
हेही वाचा – Amravati Municipal Election : अमरावतीत महायुतीला तडा ! जागावाटपावरून भाजप-शिवसेना आमनेसामने
"राष्ट्रवादीचे नेते फोन उचलत नाहीत" – संजय मोरे
ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजय मोरे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. मोरे म्हणाले की, "कालपर्यंत राष्ट्रवादीचे नेते संपर्कात होते, मात्र आज सकाळपासून अंकुश काकडे, विशाल तांबे आणि बापू पठारे यांसारख्या नेत्यांचे फोन लागत नाहीत. काही जण फोन उचलत नाहीत. काँग्रेस आणि आम्ही वारंवार निरोप देऊनही त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांची एकत्र लढण्याची मानसिकता दिसत नसल्यानेच आम्ही आता काँग्रेससोबत बोलणी सुरू केली आहे. आता ते पुन्हा चर्चेला आले तरी वेळ निघून गेली आहे."
काँग्रेसची 165 जागांची तयारी – अरविंद शिंदे
काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनीही राष्ट्रवादीच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. "आम्ही सकाळपासून राष्ट्रवादीच्या नेत्यांची प्रतीक्षा करत आहोत. काल आम्ही तिन्ही पक्षांनी मिळून काही जागा निश्चित केल्या होत्या; मात्र, आज ते का आले नाहीत हे समजत नाही. मी वैयक्तिकरित्या सर्व नेत्यांना कॉल केले पण कोणीही फोन उचलला नाही. आमची 165 जागांची यादी तयार असून आता आम्ही आणि ठाकरे गट ताकदीने निवडणूक लढवू. राष्ट्रवादी आता पुन्हा येईल असे आम्हाला वाटत नाही," असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – BMC Election 2026 : मुंबईच्या राजकारणात नवा ट्विस्ट ! एकनाथ शिंदेंचा भाचा आशिष माने अजित पवारांच्या गोटात