Phaltan Doctor Suicide Case : फलटण महिला डॉक्टर प्रकरणाचे तीव्र पडसाद हे राज्यभरात उमटत आहे. याचदरम्यान, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर विरोधकांनी आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. यानंतर निंबाळकर यांनीही विरोधकांवर प्रत्यारोप केले होते. आता मेहबूब शेख यांनी निंबाळकरांचे आव्हान स्वीकारले आहे. मेहबूब शेख यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत या प्रकरणावर गंभीर आरोप केले. मृत महिला डॉक्टरविरोधात केवळ एका महिन्यात तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तक्रार केली होती, आणि त्या तक्रारींच्या मागे कोणाचा दबाव होता, याची चौकशी झाली पाहिजे. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट घेण्याची मागणी शेख यांनी केली. तसेच, निंबाळकर यांचीही नार्को टेस्ट करा, मी स्वतःही नार्को टेस्ट द्यायला तयार आहे, असे शेख म्हणाले.
फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणी मोठा राजकीय वाद पेटला आहे. यात माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यासह सरकारवरही हे प्रकरण ढिलाईने घेतले जात असल्याचे आरोप केले जात आहेत. आता याप्रकरणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे, सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मेहबूब शेख यांच्यासह विरोधकांनी भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर धक्कादायक आरोप करत त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तसेच, ‘मी कोणाच्याही हातातला बाहुला नाही. मीही नार्को टेस्टला तयार आहे. पहिला नंबर निंबाळकरांचा, दुसरा माझा..,’ असे म्हणत मेहबूब शेख यांनी निंबाळकर यांचे आव्हान स्वीकारले.
या सर्व आरोपांनी एकीकडे उलटसुलट चर्चांना उधाण आलं असतानाच निंबाळकर यांनी वादळी पत्रकार परिषद घेत आपली रोखठोक भूमिका मांडतानाच विरोधकांना ओपन चॅलेंज दिले. माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी सोमवारी (ता.3) जाहीर पत्रकार परिषद घेत आपल्यावरील सर्व आरोप खोडून काढले. तसेच त्यांनी यावेळी फलटण डॉक्टर महिला आत्महत्येप्रकरणी आपण नार्को टेस्ट करायला तयार असल्याचं ठणकावलं. यावेळी त्यांनी आपल्या सोबत आरोप करणाऱ्या सर्वांची आणि विरोधकांची नार्को टेस्ट व्हावी, अशी मागणी केली होती. याला आता मेहबूब शेख यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
फलटण महिला डॉक्टर प्रकरणाचे तीव्र पडसाद हे राज्यभरात उमटत आहे. याचदरम्यान, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर विरोधकांनी आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. पण आता या आरोपांना त्यांनी थेट स्क्रिन लावून जोरदार पलटवार केला. ही पत्रकार परिषद संपताच रणजितसिंह निंबाळकर यांच्या समर्थकांनी त्यांचा दुग्धस्नान घातले. पत्रकार परिषदेत आक्रमक झालेले माजी खासदार मात्र यावेळी अचानक भावनिक झाले, त्यांना अश्रू अनावर झाले.
निंबाळकर म्हणाले, माझा खून झाला असता तरी चाललं असतं, मला गोळी घातली असती तरी चाललं असत, पण किती बदनाम करायचं? मात्र,तरीही आपल्याला बदलाव आणायचा आहे, बदला घ्यायचा नाही. फलटण तालुक्यातील 60 टक्के जनता आपल्यासोबत आहे असा दावाही यावेळी त्यांनी केला. या मास्टरमाईंडने मला लोकसभेत तिकीट मिळू नये, यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप करत त्यांनी हल्ला चढवला.