Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आणि ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि शिवसेना (UBT) यांनी या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हे आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे प्रत्यक्ष संवाद साधणे शक्य नसल्याने पवारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
1967 पासूनचा प्रदीर्घ संसदीय प्रवास
उमेदवारी अर्ज भरल्यानंतर शरद पवारांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे आपल्या राजकीय कारकिर्दीतील महत्त्वाच्या टप्प्यांचा उजाळा दिला. ते म्हणाले की, ‘माझा संसदीय प्रवास 1967 मध्ये महाराष्ट्र विधानसभेपासून सुरू झाला. हा 59 वर्षांचा प्रवास केवळ माझा नसून महाराष्ट्राच्या जनतेने दाखवलेल्या विश्वासाचा आहे. राज्याचे मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते ते केंद्रात संरक्षण मंत्री आणि 10 वर्षे कृषिमंत्री म्हणून काम करताना जनतेचा पाठिंबा हेच माझे सर्वात मोठे बळ राहिले आहे.’
आजारापणामुळे डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला
गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आजारी होते. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांती घेण्यास सांगितले आहे. यामुळेच त्यांनी प्रत्यक्ष माध्यमांसमोर न येता पोस्टद्वारे आपली भूमिका मांडली. “प्रत्यक्ष भेटणे शक्य नसल्याने या पत्रकाद्वारे मी आपल्यापर्यंत पोहोचत आहे,” असे त्यांनी नमूद केले.
१९६७ पासून माझा लोकप्रतिनिधी म्हणून प्रवास सुरू झाला आणि आजपर्यंत तो अखंडपणे सुरू आहे. हा प्रदीर्घ प्रवास केवळ माझा नसून महाराष्ट्राच्या जनतेचा आहे, कारण त्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे आणि पाठिंब्यामुळेच हा संसदीय प्रवास कधीही खंड न पडता पुढे सुरू ठेवणे मला शक्य झाले. १९६७… — Sharad Pawar (@PawarSpeaks) March 5, 2026
जनतेचे मानले आभार
पुन्हा एकदा राज्यसभेवर जाण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. “महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा पुढील 6 वर्षे सेवा करण्याची संधी देऊन माझ्यावर मोठा विश्वास दाखवला आहे. याबद्दल मी जनता आणि सर्व मित्रपक्षांचा ऋणी आहे,” असंही त्यांनी नमूद केलं आहे. महाराष्ट्राचे प्रेम आणि विश्वास हाच माझ्या आयुष्यातील ऊर्जेचा खरा स्त्रोत असून, पुढील काळातही जनतेच्या अपेक्षांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन, अशी ग्वाही त्यांनी दिली.