PIA Privatisation : पाकिस्तानची राष्ट्रीय विमान कंपनी असलेल्या 'पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्स' (PIA) च्या विक्री प्रक्रियेने आता वेग घेतला असून, 'आरिफ हबीब कन्सोर्टियम'ने या कंपनीसाठी सर्वाधिक बोली लावली आहे. कर्जाच्या विळख्यात अडकलेली ही विमान कंपनी विकत घेण्यासाठी विविध कंपन्यांनी आपले प्रस्ताव सादर केले आहेत.
आरिफ हबीब समूहाची सर्वात मोठी बोली
पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या 75 टक्के शेअर्सच्या लिलावात 'आरिफ हबीब कन्सोर्टियम'ने 115 अब्ज डॉलर (सुमारे 10.29 लाख कोटी रुपये) देऊन आघाडी घेतली आहे. या शर्यतीत 'लकी सिमेंट'ने 101.5 अब्ज डॉलर आणि 'एअरब्लू'ने 26.5 अब्ज डॉलरची बोली लावली आहे. आरिफ हबीब समूह हा खत निर्मितीपासून ते शिक्षण क्षेत्रापर्यंत विस्तारलेला पाकिस्तानातील एक अनुभवी कॉर्पोरेट गट मानला जातो. या विक्रीतून मिळणाऱ्या एकूण रकमेपैकी सुमारे 92.5 टक्के वाटा एअरलाईनच्या सुधारणेसाठी आणि पुनर्रचनेसाठी खर्च केला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
बिकट आर्थिक अवस्था आणि IMF चा दबाव
पीआयए (PIA) वर असलेला प्रचंड कर्जाचा डोंगर आणि ढासळलेले व्यवस्थापन यामुळे पाकिस्तान सरकारला हा कठोर निर्णय घ्यावा लागला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (IMF) 7 अब्ज डॉलरचे मदत पॅकेज मिळवण्यासाठी पाकिस्तानवर सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करण्याचा मोठा दबाव आहे. उड्डाणांची कमतरता आणि प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींमुळे सरकारला ही कंपनी चालवणे अशक्य झाले होते. विशेषतः 2020 मधील कराची विमान अपघातानंतर आणि पायलटच्या बनावट परवान्यांच्या प्रकरणामुळे जागतिक स्तरावर या एअरलाईनच्या प्रतिमेला मोठा तडा गेला होता.
हेही वाचा – SHANTI Act: देशात 'शांती' कायदा लागू; अमेरिकेकडून स्वागत; काय होणार याचा फायदा?
खाजगीकरणामागचा सरकारी उद्देश
सरकारच्या सुधारणा अजेंड्याचा भाग म्हणून पीआयएला स्वावलंबी आणि मजबूत करणे हा या खाजगीकरणाचा मुख्य उद्देश असल्याचे सल्लागार मुहम्मद अली यांनी सांगितले. या प्रक्रियेमुळे देशात परदेशी आणि देशांतर्गत गुंतवणुकीला चालना मिळेल, अशी सरकारची धारणा आहे. पीआयएकडे सध्या एअरबस A320, बोईंग 777 आणि बोईंग 737 यांसारखी एकूण 32 विमाने आहेत. बोली लावणाऱ्या कंपन्यांना सुरुवातीला देय रकमेचा दोन-तृतीयांश हिस्सा द्यावा लागेल, तर उर्वरित एक-तृतीयांश रक्कम नंतर भरता येईल, अशी सवलतही सरकारने दिली आहे.
भविष्यातील आव्हाने आणि नवीन भागीदारी
बोली लावल्यानंतर दोन नवीन भागीदार जोडण्याची मुभा सुद्धा सरकारने या प्रक्रियेत दिली आहे. एअरलाईनच्या पुनर्गठनासाठी हा लिलाव अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून, नवीन मालक या तोट्यात चालणाऱ्या कंपनीचा चेहरामोहरा बदलण्यात यशस्वी होतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. अनेक देशांनी पीआयएच्या उड्डाणांवर बंदी घातल्यामुळे बंद पडलेली कमाई पुन्हा सुरू करणे हे नवीन व्यवस्थापनासमोर सर्वात मोठे आव्हान असेल.
हेही वाचा – AI Developer Sweeping Streets: भारतीय इंजिनिअर तरुणाने रशियात मारला झाडू, कारण वाचून नेटीझन्स झाले भावूक