Opration Tiger: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी 18 जून रोजी आपल्या सर्व लोकसभा सदस्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बैठक आयोजित केली होती. खासदारांची पक्षाप्रती असलेली निष्ठा तपासण्यासाठी या बैठकीत अनिवार्य उपस्थितीचा व्हिप देखील बजावण्यात आला होता. मात्र, ठाकरे गटाच्या एकूण 9 खासदारांपैकी केवळ 3 खासदार या बैठकीला हजर राहिले, तर 6 खासदारांनी याकडे पूर्णपणे पाठ फिरवली. यामुळे विरोधकांचे 'ऑपरेशन टायगर' यशस्वी झाल्याचे स्पष्ट झाले असून ठाकरे गटाला दिल्लीत फार मोठा धक्का बसला आहे. या अनुपस्थित लोकप्रतिनिधींवर कडक कायदेशीर पाऊले उचलण्यासाठी ठाकरे गटाने आता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे लेखी तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे.
पक्ष सोडण्यासाठी काँग्रेस विलीनीकरणाची भीती; बंडखोरांचे अजब स्पष्टीकरण
उद्धव ठाकरेंची साथ सोडणाऱ्या या 6 खासदारांनी पक्षातून बाहेर पडताना एक विशेष ठराव संमत केला आहे. या ठरावात त्यांनी पक्ष सोडण्याचे जे कारण दिले आहे, ते राजकीय वर्तुळात थट्टेचा विषय ठरत आहे. त्यांच्या मते, ठाकरे गट भविष्यात संपूर्णपणे काँग्रेस पक्षामध्ये विलीन होऊ शकतो अशी भिती त्यांना वाटत आहे. संजय राऊत यांनी तृणमूल काँग्रेसला दिलेल्या विलीनीकरणाच्या सल्ल्याचा आधार घेत या बंडखोरांनी आपला संशय व्यक्त केला आहे. मूळ विचारसरणी आणि विकासाचे मुद्दे बाजूला सारून, केवळ काँग्रेसमधील संभाव्य विलीनीकरणाच्या भीतीपोटी आपण मुख्य प्रवाहातून बाजूला होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे, या खासदारांनी स्वतःचा स्वतंत्र गट न स्थापन करता, थेट एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मूळ शिवसेनेत सामील होण्याचा प्रस्ताव लोकसभा अध्यक्षांना दिला आहे.
अनुपस्थित खासदारांना ठाकरे गटाचा अल्टिमेटम
दरम्यान, बैठकीच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या सर्व 6 खासदारांविरोधात ठाकरे गटाने आक्रमक पवित्र घेतला आहे. या सर्व बंडखोरांना आजच तातडीने कारणे दाखवा नोटीस पाठवली जात आहे. या नोटिसीला उत्तर देण्यासाठी त्यांना केवळ काही तासांचीच मुदत दिली जाणार असून, विहित वेळेत स्पष्टीकरण न आल्यास त्यांच्यावर अपात्रतेची कायदेशीर कारवाई सुरू केली जाईल. आता हा संपूर्ण वाद लोकसभा अध्यक्षांच्या न्यायालयात पोहोचणार असून, बंडखोर गटाला मान्यता द्यायची की त्यांच्यावर कारवाई करायची, याचा अंतिम निर्णय अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या भूमिकेवर अवलंबून असेल.
बंडखोर लोकप्रतिनिधींच्या घराबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त
ठाकरे गटात झालेल्या या मोठ्या बंडखोरीमुळे राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत. बंड करण्याच्या तयारीत असलेल्या सर्व 6 खासदारांच्या निवासस्थानाबाहेर पोलीस सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. मुंबईतील खासदार संजय दिना पाटील यांच्या घराबाहेरही मोठा बंदोबस्त तैनात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नॉट रीचेबल असलेल्या या बंडखोर खासदारांच्या नवीन गटाचे नेतृत्व खासदार संजय जाधव यांच्याकडे सोपवले जाण्याची शक्यता आहे.