Indian Navy Advisory: होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये (Strait of Hormuz) दोन भारतीय जहाजांवर गोळीबार झाल्याच्या गंभीर घटनेनंतर, भारतीय नौदलाने 18 एप्रिल रोजी या सागरी पट्ट्यात सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक केली आहे. पर्शियन आखातातील भारताचा ध्वज असलेल्या जहाजांसाठी नौदलाने एक विशेष सुरक्षा सूचना (Advisory) जारी केली आहे. या नवीन निर्देशानुसार, सर्व भारतीय जहाजांनी सुरक्षेच्या कारणास्तव 'लारक बेटा'पासून (Larak Island) दूर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, या संवेदनशील भागातून प्रवास करताना केवळ नौदलाच्या विशिष्ट मार्गदर्शनाखाली आणि परवानगीनंतरच पुढे जावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
भारतीय जहाजांवर इराणी रक्षकांकडून गोळीबार
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या भारतीय जहाजांच्या सुरक्षेला नौदल सर्वोच्च प्राधान्य देत आहे. आतापर्यंत 11 भारतीय जहाजांनी ही सामुद्रधुनी यशस्वीरित्या पार केली आहे. सर्वात अलीकडे, 'देश गरिमा' (Desh Garima) या टँकरने 18 एप्रिल रोजी आपला प्रवास पूर्ण केला. मात्र, दुर्दैवाने त्याच दिवशी 'जग अर्णव' (Jag Arnav) आणि 'सॅनमार हेराल्ड' (Sanmar Herald) या दोन भारतीय जहाजांना इराणी रक्षकांकडून झालेल्या गोळीबाराचा सामना करावा लागला. या हल्ल्यामुळे या जहाजांना आपला मार्ग बदलून माघारी फिरावे लागले आहे.
'देश गरिमा' 22 एप्रिलला मुंबईत पोहोचणार
होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार केलेले 'देश गरिमा' हे जहाज सध्या अरबी समुद्रात भारतीय नौदलाच्या कडक सुरक्षा कवचाखाली आहे. हे जहाज 22 एप्रिल रोजी मुंबई बंदरात पोहोचण्याची दाट शक्यता आहे. ज्या लारक बेटाजवळ हा तणाव निर्माण झाला आहे, ते होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या सर्वात अरुंद भागात वसलेले असून इराणच्या तेल पायाभूत सुविधांसाठी ते अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या बेटाच्या सामरिक महत्त्वामुळे इराणने या परिसरात मोठी तटबंदी आणि रडार यंत्रणा तैनात केली आहे.
हेही वाचा – India-Russia Defense Pact: जागतिक महासत्तांना धक्का! भारत-रशिया संरक्षण कराराने धास्तावले चीन-अमेरिका
इराणी लष्करी तळांचे आव्हान आणि नौदलाची सज्जता
होर्मुझची सामुद्रधुनी केवळ 33 किलोमीटर रुंद असून जगातील एकूण तेल पुरवठ्यापैकी 20 टक्के वाहतूक याच मार्गावरून होते. इराणकडे या भागात वेगवान नौका आणि लष्करी तळांचे जाळे असल्याने जहाजांना लक्ष्य केले जाण्याचा धोका वाढला आहे. सध्या 14 भारतीय जहाजे पर्शियन आखातात अडकली असून ती सामुद्रधुनी पार करण्याच्या प्रतीक्षेत आहेत. या जहाजांना सुरक्षा देण्यासाठी भारतीय नौदलाने आपली 7 युद्धनौका पर्शियन आखाताच्या नजीक तैनात केल्या आहेत. जोपर्यंत नौदलाचे पूर्ण संरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही जहाजाला पुढे न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.