Operation Tiger: राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या 'ऑपरेशन टायगर' या गुप्त मोहिमेची जोरदार चर्चा रंगली आहे. लोकसभा पातळीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या 6 खासदारांना आपल्या गळाला लावल्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपला मोर्चा थेट देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई पालिकेकडे (BMC) वळवला आहे. दिल्लीतील मोठ्या राजकीय भूकंपानंतर आता मुंबईतही मोठी उलथापालथ घडवून आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ठाकरे गटाचे तब्बल 20 पेक्षा जास्त माजी नगरसेवक थेट एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा शिंदे गटाचे नेते किरण लांडगे यांनी केला आहे. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
'कधी प्रवेश करायचा सांगा?; माजी नगरसेवकांमध्ये पक्षबदलाची उत्सुकता
माध्यमांशी संवाद साधताना किरण लांडगे यांनी सांगितले की, ठाकरे गटाला मुंबईत खिंडार पाडण्याची पूर्ण तयारी झाली आहे. 20 हून अधिक माजी नगरसेवक सातत्याने शिंदे गट शिवसेनेत येण्यासाठी उत्सुक असून, "पक्षात अधिकृत प्रवेश कधी करायचा?" अशी विचारणा करत आहेत. या नगरसेवकांच्या प्रवेशाबाबत पक्षाची वरिष्ठ पातळी लवकरच अंतिम निर्णय घेणार आहे. हे सर्व लोकप्रतिनिधी अधिकृतपणे पक्षात सामील झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संख्याबळ आणि राजकीय ताकद कमालीची वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
21 जूननंतर होणार खासदारांच्या विलीनीकरणाची अधिकृत घोषणा?
दुसरीकडे, ठाकरे गटातून बंडखोरी केलेल्या 6 खासदारांचा शिंदे गटात सामील होण्याचा सोहळा सुरुवातीला 19 जून रोजी पक्षाच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून होणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, काही तांत्रिक अडचणी आणि कायदेशीर पेच अद्याप सुटलेले नसल्याने हा कार्यक्रम काही काळ पुढे ढकलण्यात आला आहे. आता 21 जूननंतर या 6 खासदारांच्या अधिकृत विलीनीकरणाची घोषणा होण्याची शक्यता दाट आहे. पक्षांतरबंदी कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी आवश्यक असणारे दोन-तृतीयांश बहुमत गोळा करण्यात आणि दिल्ली दरबारी योग्य मोर्चेबांधणी करण्यात खासदार श्रीकांत शिंदे यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
लोकसभा अध्यक्षांच्या पत्राभोवती सस्पेन्स
दरम्यान, बंडखोर 6 खासदारांनी संसदेत आपला स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबतचे अधिकृत पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना सोपवल्याचा दावा केला जात आहे. परंतु, अद्याप या खासदारांच्या स्वाक्षऱ्यांचे कोणतेही पत्र किंवा फोटो सार्वजनिक न झाल्याने याविषयीचा सस्पेन्स कायम आहे. याच कारणामुळे "परिस्थिती पूर्णपणे स्पष्ट होईपर्यंत आपल्या खासदारांवर कोणतीही नकारात्मक किंवा घाईघाईची टीका करू नका," अशा कडक सूचना 'मातोश्री'वरून प्रवक्त्यांना आणि नेत्यांना देण्यात आल्याचे समजते.
दिल्लीत ठाकरे गटाची तातडीची बैठक
या संभाव्य फुटीला रोखण्यासाठी ठाकरे गटाने आज नवी दिल्लीत सकाळी 11:00 वाजता आपल्या संसदीय दलाची आपत्कालीन बैठक बोलावली आहे. ही बैठक म्हणजे खासदारांच्या एकनिष्ठतेची लिटमस टेस्ट मानली जात आहे. पक्षाने सर्व खासदारांना उपस्थित राहण्यासाठी 'व्हिप' जारी केला आहे. ठाकरे गटाच्या दाव्यानुसार, 6 पैकी 2 खासदारांना दिलेली आश्वासने पाळली न गेल्याने त्यांनी कोणत्याही पत्रावर स्वाक्षरी केलेली नाही, त्यामुळे बंडखोरांकडे आवश्यक आकडा नाही. या हायव्होल्टेज बैठकीच्या निकालाकडे आता अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.