GPF Interest Rate 2026: सरकारी कर्मचाऱ्यांना कोणताही दिलासा नाही; GPF आणि PPF व्याजदर ‘जैसे थे’चं

एप्रिल ते जून 2026 या नवीन तिमाहीसाठी 'सामान्य भविष्य निर्वाह निधी'चा (GPF) व्याजदर जाहीर झाला असून, यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

GPF Interest Rate 2026: सरकारी कर्मचाऱ्यांना कोणताही दिलासा नाही; GPF आणि PPF व्याजदर ‘जैसे थे’चं

GPF Interest Rate 2026: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थ मंत्रालयाकडून एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. एप्रिल ते जून 2026 या नवीन तिमाहीसाठी 'सामान्य भविष्य निर्वाह निधी'चा (GPF) व्याजदर जाहीर झाला असून, यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. हा दर पूर्वीप्रमाणेच 7.1 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. अर्थ मंत्रालयाच्या परिपत्रकानुसार, 1 एप्रिल 2026 ते 30 जून 2026 या कालावधीत जमा होणाऱ्या रकमेवर हाच वार्षिक व्याजदर लागू असेल, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मिळणाऱ्या परताव्यामध्ये कोणतीही वाढ होणार नाही.

विविध सरकारी निधींना एकच दर लागू
हा व्याजदर केवळ सामान्य GPF पुरता मर्यादित नसून, तो इतर अनेक तत्सम निधींनाही लागू होतो. यामध्ये प्रामुख्याने 'केंद्रीय सेवा GPF', 'अखिल भारतीय सेवा भविष्य निर्वाह निधी', 'राज्य रेल्वे भविष्य निर्वाह निधी' आणि 'संरक्षण सेवा भविष्य निर्वाह निधी' यांचा समावेश होतो. या निर्णयामुळे संरक्षण, रेल्वे आणि केंद्रीय विभागांतील लाखो कर्मचाऱ्यांच्या बचतीवरील व्याजदर आता स्थिर राहणार आहे.

GPF चे स्वरूप आणि महत्त्व
'सामान्य भविष्य निर्वाह निधी' (GPF) ही केवळ सरकारी कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध असलेली एक विशेष बचत योजना आहे. या योजनेत कर्मचारी आपल्या मासिक वेतनाचा एक ठराविक भाग जमा करतात. निवृत्तीच्या वेळी ही सर्व जमा पुंजी व्याजासह एकरकमी (Lump sum) स्वरूपात कर्मचाऱ्याला मिळते. सुरक्षितता आणि खात्रीशीर परतावा यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये ही योजना अत्यंत लोकप्रिय आहे, मात्र गेल्या काही काळापासून व्याजदरात वाढ न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये काहीशी नाराजी दिसून येत आहे.

हेही वाचा – GPay चं ‘Pocket Money’ फिचर स्कॅम आहे? व्हायरल मेसेजमागचं धक्कादायक सत्य जाणून घ्या

PPF आणि लहान बचत योजनांमधील स्थिती
GPF सोबतच सरकारने 'सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी' (PPF) चा व्याजदरही 7.1 टक्क्यांवर स्थिर ठेवला आहे. तसेच 'सुकन्या समृद्धी योजना', 'ज्येष्ठ नागरिक बचत योजना' आणि 'राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र' (NSC) यांसारख्या लोकप्रिय लहान बचत योजनांच्या व्याजदरातही कोणतीही सुधारणा करण्यात आलेली नाही. दुसरीकडे, खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या 'कर्मचारी भविष्य निर्वाह निधी'चा (EPF) व्याजदर 8.25 टक्के इतका असून, तो GPF च्या तुलनेत अधिक आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number